जालना : राज्यभरात लाखो बोगस जन्माचे दाखले वितरित करण्यात आल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. जालना जिल्ह्यात देखील 11 हजारांवर बोगस प्रमाणपत्रे वाटण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, जालना येथील जिल्हा महिला रुग्णालयातून 1 हजार 719 जन्माचे बोगस दाखले वितरित करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी येथे दिली.

किरिट सोमय्या यांनी महिला बाल रुग्णालय येथे आढावा बैठक घेतली. जालना जिल्हा महिला रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मागच्या जिल्हा दौऱ्यात केला होता. दरम्यान, याबाबत सोमय्या यांनी जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाला भेट दिली. 1719 जन्म प्रमाण पत्र वाटपात घोटाळा झाला असल्याचा आरोप करित कदीम जालना पोलिस ठाण्यात या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. जिल्हा महिला रुग्णालयातून 2 हजार 532 जन्म प्रमाणपत्र देण्यात विलंब केल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला. 1 वर्षांपेक्षा अधिक विलंबित जन्म नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा जिल्हा दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना असताना दवाखान्याचे जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षक यांनी हा घोटाळा केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
वैद्यकीय अधीक्षकांवर टांगती तलवार…
जिल्हा स्त्री रुग्णालयातून वाटप करण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रांबद्दल सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयातून वाटप करण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रांची चौकशी केली जाईल, असं ही सोमय्या म्हणाले. दरम्यान, या चौकशीत जो कोणी अधिकारी – कर्मचारी दोषी आढळेल त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. त्यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यावरही चौकशीची टांगती तलवार राहणार आहे.