जालना : राजकीय पटलावर देखील महिलांचे अर्धे आकाश सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 33 जागा महिलांसाठी राखीव असूनही महिलांनी आरक्षणाची चौकट मोडून काही सर्वसाधारण जागांवर देखील आपली छाप पाडली आहे.

विनोद काळे / जालना : राजकीय पटलावर देखील महिलांचे अर्धे आकाश सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 33 जागा महिलांसाठी राखीव असूनही महिलांनी आरक्षणाची चौकट मोडून काही सर्वसाधारण जागांवर देखील आपली छाप पाडली आहे.
जालना शहर महानगरपालिकेच्या आरक्षित ३३ जागांच्या व्यतिरिक्त ७ महिला उमेदवारांनी सर्वसाधारण, ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या जागांवर थेट पुरुष उमेदवारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे यंदाची मनपा निवडणूक ही महिलाशक्तीच्या आत्मविश्वासाची ताकद वाढवणारी ठरणार आहे.
जालना शहरातील १६ प्रभागांतून ६५ नगरसेवक निवडले जाणार असून, त्यातील निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. मात्र राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक महिलांनी आपले वेगळे स्थान आणि ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ‘आरक्षणापुरते मर्यादित राजकारण’ ही संकल्पना मोडीत काढत खुल्या गटातून निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय महिलांनी घेतला आहे. त्यांना संधी देण्याचे औदार्य देखील पुरुषांनी दाखवले हे वाखाणण्याजोगे आहे.
अनुसूचित जाती, ओबीसी तसेच सर्वसाधारण प्रभागांत अपक्ष आणि विविध राजकीय पक्षांच्या महिला उमेदवारांची दमदार उपस्थिती आहे. विशेषतः सर्वसाधारण असलेल्या प्रभाग १५- ड मध्ये भाजपने महिला उमेदवारास उमेदवारी दिली आहे.
पुरुष उमेदवारांचा परंपरागत दबदबा असलेल्या प्रभागांत महिलांना संधी देणे, धाडसी पाऊल ठरले आहे. पती किंवा कुटुंबाच्या ओळखीवर नव्हे, तर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर या रणरागिणी मैदानात उतरल्याने प्रस्थापित राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरणार
महिलांच्या राजकीय उमेदवारीला बळ देणारी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे महिला मतदारांची वाढलेली संख्या. २०१६ च्या तुलनेत २०२६ मध्ये जालना शहरातील महिला मतदारांमध्ये तब्बल १८,१५२ ने वाढ झाली आहे. पुरुष मतदारांमध्ये १४,९८८ ची वाढ झाली असताना महिलांची वाढ सुमारे ३ हजारांनी अधिक आहे.
महिला मतदारांची ही वाढ आणि खुल्या प्रभागांतील महिलांची उमेदवारी यामुळे यंदाच्या जालना महापालिका निवडणुकीत महिलांचा कौल निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, यंदाच्या सभागृहात महिलांचे संख्याबळ केवळ ५० टक्क्यांपुरते न राहता त्याही पुढे जाणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
