Wheel burst on police car : महामार्ग वाहतूक शाखा पोलिस कर्मचाऱ्यांच्या धावत्या वाहनाचे पाठीमागील चाक फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर : महामार्ग वाहतूक शाखा पोलिस कर्मचाऱ्यांच्या धावत्या वाहनाचे पाठीमागील चाक फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव शिवारात गीतांजली हॉटेल समोर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक कापुरे, सहाय्यक निरीक्षक जाधव, पोलिस अंमलदार लघाने अशी अपघातात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक कापुरे, जाधव आणि पोलिस अंमलदार लघाने ही तिघेही मंगळवारी सायंकाळी धुळे – सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने शासकीय वाहन क्रमांक (एमएच-20-जीके-3617) ने प्रवास करीत होते.
चित्तेपिंपळगाव जवळील गीतांजली हॉटेल समोर आल्यावर पोलिसांच्या गाडीचे पाठीमागील चाक अचानकपणे फुटल्याने भरधाव जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अँगलला तोडून उलटली. या अपघातात तिन्ही पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.