भोकरदन : तालुक्यासह शहराला शनिवारी सायंकाळपासून कमी अधिक तर मध्यरात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेकडो दुकानांसह अनेक घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे शेतकरी व व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण जालना जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

भोकरदन : तालुक्यासह शहराला शनिवारी सायंकाळपासून कमी अधिक तर मध्यरात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेकडो दुकानांसह अनेक घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे शेतकरी व व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण जालना जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. ज्यामुळे शहरातील केळना नदीला सलग तिसऱ्यांदा पूर आला होता, तर तालुक्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसाने शहराच्या सखल भागांत आणि मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक दुकानांमधील इलेक्ट्रिक माल, धान्य, कपडे आणि इतर साहित्य पाण्यात भिजून पूर्णपणे नष्ट झाले आहे. अनेकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर शहरातील बाजार पट्टी भागात रात्रभरापासून घरात पाणी शिरल्याने तीस ते पस्तीस घरांना आठवडी बाजार पट्टीच्या ओट्यावर आश्रय घ्यावा लागला. दुकानांप्रमाणेच अनेक नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले असल्याने, फर्निचर आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला
ग्रामीण भागाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप पीक वाया गेले आहे, पीकं मातीमोल झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील शेतीत हाहाकार माजला आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारखी महत्त्वाची खरीप पिके काढणीला तयार होती किंवा काही ठिकाणी त्यांची काढणी सुरू होती. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी शेतात तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कापणीसाठी तयार असलेले पीक भुईसपाट झाले आहे, तर पाण्यात बुडून सोयाबीन, कापूस आणि इतर पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बी-बियाणे, खते आणि मजुरीवर केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी आता तातडीने पंचनामे करून पुरेशी नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे करत आहेत.
दानवे पिता-पुत्रांची पाहणी
भोकरदन शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आ. संतोष दानवे यांनी तातडीने शहरातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. तर त्यांनी स्थानिक प्रशासनाला बचावकार्य अधिक गतिमान करण्याचे आणि नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
