बुलढाणा : बंधाऱ्याचे पाणी नदीपात्रात तुंबल्याने रस्ता बंद होवून शेतात जाणे अवघड झाले असून यासंदर्भात ठोस उपाय काढून शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करावा, यामागणीचे निवेदन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मलकापूर तालुकाप्रमुख अनेक शेतकऱ्यांसह बुलढाणा येथील जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शनिवारी दाखल झाले होते.

बुलढाणा : बंधाऱ्याचे पाणी नदीपात्रात तुंबल्याने रस्ता बंद होवून शेतात जाणे अवघड झाले असून यासंदर्भात ठोस उपाय काढून शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करावा, यामागणीचे निवेदन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मलकापूर तालुकाप्रमुख अनेक शेतकऱ्यांसह बुलढाणा येथील जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शनिवारी दाखल झाले होते. मात्र, अधिकारी हजर नसल्याने संतप्त आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्याच खुर्चीला हार घालून निषेध नोंदविला. त्यानंतर, निवासी जिल्हाधिकारी जयश्री ठाकरे यांच्याकडे निवेदन पत्र सुपूर्द करण्यात आले.
मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथे गट क्रमांक ४९ नजीक मोहगंगा नदीपात्रामध्ये २०१९ मध्ये सिमेंटचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे पाणी नदीपात्रात तुंबल्यामुळे शेतात जाण्याच्या रस्ता बंद झाला होता. त्यानंतर, मे २०२३ मध्ये नदीपात्रामध्ये हयुम पाईप बॉक्स कल्व्हर्टचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले. मात्र निकृष्ट कामामुळे रस्ता रखडून गेला होता. रस्ता खुला करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ व शिवसैनिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा निवेदणातून देण्यात आला आहे. याप्रकरणाचे निवेदन जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे यांना देण्याचे ठरले होते, मात्र ते हजर नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना खुर्चीला हार घालून निषेध नोंदवला. याप्रसंगी सुरेश बऱ्हाटे, राजेंद्र काजळे, पांडुरंग बऱ्हाटे, परशूराम बऱ्हाटे, ओंकार बऱ्हाटे, गोपाळ पाटील, सुनील विखारे, अजय विखारे, गणेश सुशीर, सतीश शेळके, प्रफुल वराडे आदी हजर होते.