Two-wheelers collided head-on: शहरातील म्हाडा रोडवर ३० मार्च रोजी भीषण अपघात झाला होता. यामधील जखमी असलेल्या युवकाचा उपचार सुरू असतांना आज 5 एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. नसीम अहेमद शेख (२६ रा.फुलेनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
भोकरदन (जालना) : शहरातील म्हाडा रोडवर ३० मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. यामधील जखमी असलेल्या युवकाचा उपचार सुरू असतांना आज 5 एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. नसीम अहेमद शेख (२६ रा.फुलेनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथून मृतदेह नातेवाईकांनी भोकरदन पोलीस ठाण्यात आणला. जोपर्यंत संबंधित आरोपीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
भोकरदन शहरातील म्हाडा रोडवर झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये नसीम अहेमद शेख, समीर शहा या दोघांचा समावेश होता. यातील नसीम शेख यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने गेल्या सात दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. नसीम शेख यांचा आज सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी गेल्या सात दिवसांपासून अपघातातील संबंधित संयशीत आरोपीवर पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा सवाल करत मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून मृतदेह भोकरदन पोलीस ठाण्यात आणला. तसेच कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याची भूमिका घेतली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी संबंधितावर कायदेशीर कारवाई करुन असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतक नसीम शेख यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ, चार बहीण असा मोठा परिवार आहे.
दोन चिमुकले झाले पोरके
भोकरदन शहरातील फुलेनगर येथील नसीम अहेमद शेख हा युवक वीट भट्टीवर काम करून उदारनिर्वाह करत होता. मागील आठवड्यात कामावरुन घरी जात असताना त्याचा अपघात झाला होता. गेल्या सात दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज सकाळी मृत्यू झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांचे दोन चिमुकले वडिलांची वाट पाहत होते. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजतात पत्नीसह चिमुकल्यांनी मोठा आक्रोश केला.