छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील महिला कीर्तनकार संगीता आण्णासाहेब पवार (४५ वर्षे) यांची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोन मजूरांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवार, 2 जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील महिला कीर्तनकार संगीता आण्णासाहेब पवार (४५ वर्षे) यांची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोन मजूरांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवार, 2 जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्फ भायला चौहाण (25 वर्षे), अनिल उर्फ हाबडा विलाला (23 वर्षे), दोघे रा. अंजली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात २७ जून रोजी रात्री चोरट्यांनी संगीता पवार या कीर्तनकार महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आश्रमातील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता 20 ते 25 वयोगटातील दोन चोरटे आश्रमातील मोहटा देवी मंदिराचे चॅनल गेट लोखंडी सळईने तोडत असतांना दिसून आले. तसेच ते दोघांशी हिंदी भाषेत बोलत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संतोष चौहाण याला महालगाव शिवारातील गणेश भेळ सेंटरजवळून 1 जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने अनिल उर्फ हाबडा विलाला याच्या साथीने महिला कीर्तनकार संगीता पवार यांचा दगडाने ठेचून खून केला असल्याची कबूली दिली. पोलिसांनी शिरपूर सिमेवरुन मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनिल उर्फ हाबडा विलाला याला अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक सतीश वाघ, विरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे आदींच्या पथकाने संतोष चौहाण व अनिल विलाला यांना अटक करण्याची कारवाई केली. स्थानिक गुन्हेशाखेच्या ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी विरगाव पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.