30 फुट खोल विहिरीत उतरून नीलगायीची थरारक सुटका ; भोकरदन तालुक्यात वनविभागाची रेसक्यू मोहीम 

धावडा :भोकरदन तालुक्यातील भायडी गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे ३० फूट खोल विहिरीत नीलगाय पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच स्थानिक शेतकरी महेश दसपुते यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वन्यजीव बचाव पथकाने तिला सुरक्षित विहिरीतून बाहेर काढले.

धावडा :भोकरदन तालुक्यातील भायडी गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे ३० फूट खोल विहिरीत नीलगाय पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच स्थानिक शेतकरी महेश दसपुते यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वन्यजीव बचाव पथकाने तिला सुरक्षित विहिरीतून बाहेर काढले.

 विहिरीमध्ये अंदाजे ६ ते ८ फूट पाणी असल्याने नीलगाय बुडाली नाही, मात्र बाहेर पडण्यासाठी ती सतत धडपड करत होती. विहीर खोल, कच्च्या मातीची आणि निसरडी असल्याने बचावकार्य अत्यंत जोखमीचे ठरत होते. उत्तर वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक वनसंरक्षक  सुदाम मुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांनी त्वरित मराठवाड्यात कार्यरत असलेल्या ‘मॅन विथ इंडिज फाउंडेशन’च्या वन्यजीव बचाव पथकाला पाचारण केले.

अत्याधुनिक बचाव साहित्याने सज्ज असलेले संस्थेचे बचावकर्ते आशिष जोशी व मयूर हसवाल यांनी मोठ्या धैर्याने विहिरीत उतरून नीलगायीला कोणतीही इजा न होऊ देता, तिला तणावात न जाऊ देता सुरक्षितपणे बचाव साहित्याशी जोडले. त्यानंतर जेसीबी व ग्रामस्थांच्या मदतीने नीलगायीला काळजीपूर्वक विहिरीबाहेर काढण्यात आले.

सुमारे तासभर चाललेल्या या थरारक बचाव मोहिमेनंतर नीलगाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली व प्राथमिक तपासणीनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या मोहिमेत रेस्क्यू टीमचे चिदंबर काळे, तसेच वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, अतिरिक्त वनपाल भोकरदन संभाजी हाटकर, वनरक्षक आनंद वरशीळ, वनरक्षक बावणे, वनसेवक शिनगारे आणि स्थानिक तरुणांनी मोलाची मदत केली. यावेळी वन अधिकाऱ्यांनी संपूर्ण बचाव पथकाच्या कार्याचे कौतुक केले तसेच गावकऱ्यांना उघड्या विहिरींना सुरक्षाभिंत बांधण्याचे आवाहन केले, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.

ही घटना मानव–वन्यजीव सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित करणारी असून, मॅन विथ इंडिज फाउंडेशन व वनविभागाच्या समन्वयामुळे एका मौल्यवान जीवाचे प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »