रिसोड : नगरपरिषदेत दोन सदस्यपदांसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या चुरशीची झाली असून, दोन्ही प्रभागांत भाजप व काँग्रेस आमनेसामने आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन अटळ ठरणार असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी जड जात असल्याचे चित्र आहे. प्रचारातही काँग्रेसला अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नगराध्यक्षपद व इतर प्रभागांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सदस्यपदाच्या या दोन जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग ५ (ब) मध्ये भाजपकडून पवन कमलकिशोर छीत्तरका तर काँग्रेसकडून बंडू रामकिसन वानखडे रिंगणात आहेत. येथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार असून, पारंपरिकपणे काँग्रेसकडे झुकणारी दलित मते वंचितकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रभाग १० (अ) मध्ये भाजपच्या अंजली यशवंत देशमुख व काँग्रेसच्या शितल बंडू वानखडे आमनेसामने असून, अपक्ष उमेदवारामुळे येथेही मतविभाजन काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. एकाच घरातील पती-पत्नी दोन्ही प्रभागांत काँग्रेसकडून उमेदवार असल्याने कार्यकर्ते व मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकूणच, महायुतीची एकजूट, प्रभावी प्रचार आणि मतविभाजनाचा लाभ भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता अधिक असून, अंतर्गत नाराजी, वंचितचा प्रभाव आणि पती-पत्नी उमेदवारीचा मुद्दा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे रिसोडमधील ही सदस्यपदाची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेऐवजी अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
एका घरातील दोन उमेदवार; काँग्रेसविरोधात नाराजीचा सूर
या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे एकाच घरातील पती-पत्नी दोन्ही प्रभागांत काँग्रेसकडून उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. प्रभाग ५ (ब) मध्ये बंडू वानखडे, तर प्रभाग १० (अ) मध्ये त्यांच्या पत्नी शितल वानखडे मैदानात आहेत. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे. ‘एका घरापुरती उमेदवारी’ अशी टीका होत असून, त्यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता आणि संघटनात्मक ताकद दोन्ही प्रभागांत प्रश्नांकित होत असल्याचे चित्र आहे.