वाशिम : समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात म्यानमार देशातील दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर आणि एक किरकोळ जखमी झाला आहे. चालकासह तिघे प्रवासी सुखरूप बचावले. हा अपघात झोपेची डुलकी लागल्याने झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना 18 ऑक्टोबर रोजी पहाटे अंदाजे 1.55 वाजता समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक 232/300 या ठिकाणी घडली. एमएच 01 बीबी 1215 क्रमांकाची कार मुंबईहून जगन्नाथ पुरीकडे जात असताना चालक अजय वाल्मिकी (वय 38, मुंबई) याला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे कारने नियंत्रण सुटून मध्यभागी असलेल्या एमबीसीबी (मीडियन बॅरिअर) ला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कार पूर्णपणे चेंगरून एमबीसीबी च्या आतमध्ये घुसली. अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक नितीन दांदडे,आणि पथक दाखल झाले. त्यांनी क्यूआरव्ही वाहनाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. डॉक्टरांनी घटनास्थळीच दोन प्रवाशांना मृत घोषित केले. मृतांमध्ये मिन ऑंग (वय 33 वर्षे, रा. म्यानमार), मिन चित ऑंग (वय 13 वर्षे, रा. म्यानमार) यांचा समावेश आहे. या अपघातात तिहा (वय 60, रा. म्यानमार) गंभीर जखमी झाले असून, चालक अजय वाल्मिकी किरकोळ जखमी झाला आहे. सर्व जखमींना व मृतदेहांना ॲम्बुलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे हलविण्यात आले. कारमध्ये एकूण सात प्रवासी होते, त्यापैकी तीन प्रवासी विना दुखापत बचावले.