जालना : राज्यातील 29 वी महानगरपालिका म्हणून दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र, मनपाच्या तिजोरीत आधीच खडखडाट असल्यामुळे निवडणुकीसाठी लागणारा निधी कसा उभा करणार, हा प्रश्न पालिका प्रशासनापुढे उभा ठाकला होता. दरम्यान, शासनाकडे निधीची मागणी करूनही अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून करण्यात कर वसुलीच्या पैशातून निवडणूक खर्च भागवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

जालना शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून शुकवार, 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या तयारीची माहिती मनपाचे उप आयुक्त केशव कानपुडे यांनी दिली. त्यानंतर निवडणूक खर्चाच्या निधीबाबत पत्रकारांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना मित्तल म्हणाल्या, निवडणुकीसाठी साधारणपणे 7 कोटी 40 लाखांच्या निधीची गरज असून तशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. मात्र, आम्ही असे ठरवले आहे की, निवडणुकीचा खर्च महानगरपालिकेच्या निधीतून करू. त्यासाठी पालिकेने कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. याचा फायदा झाला. शहरातील नागरिकांनी कर भरण्यासाठी पुढाकार घेतला. आतापर्यंत पालिकेकडे 3 कोटी 50 लाखांचा कर जमा झाला आहे. याशिवाय शासनाचा निधी देखील येईलच. तसेच शासनाकडे वस्तू व सेवा कर आणि स्टँपड्युटीचा निधी शासनाकडे प्रलंबित आहे, तो सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक खर्च भागवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची उपस्थिती होती.
खर्चाला कात्री
महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे आम्हाला कमी खर्चात ती उत्तमरित्या पार पाडायची आहे. त्यासाठी आम्ही निवडणुकीतील खर्चाला देखील कात्री लावली आहे. कमीतकमी खर्चात निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.