बुलढाणा : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी 2 मे पासून सुरू होत आहे. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी 29 एप्रिल रोजी राज्यातील प्रथमिक व माध्यमिक सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

बुलढाणा : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी 2 मे पासून सुरू होत आहे. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी 29 एप्रिल रोजी राज्यातील प्रथमिक व माध्यमिक सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शिक्षण संचालकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, 2 मे 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा लागणार आहे.
नवीन शैक्षणिक सत्र 16 जूनपासून
पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, 16 जून 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, 23 जून 2025 ते 28 जून 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार 30 जून 2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे आणि शरद गोसावी यांनी दिल्या आहेत.