डोणगाव : भरधाव कार डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार तर तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार 23 एप्रिलच्या सकाळी 6.15 वाजेदरम्यान समृध्दी महामार्गावरील कॉरिडोर चॅनल क्रमांक 299.1 वर घडली. हा अपघात एव्हढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला होता.

डोणगाव : भरधाव कार डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार तर तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार 23 एप्रिलच्या सकाळी 6.15 वाजेदरम्यान समृध्दी महामार्गावरील कॉरिडोर चॅनल क्रमांक 299.1 वर घडली. हा अपघात एव्हढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला होता.
नागपूर ते मुंबईचा प्रवास सुखकर, सोयीचा आणि कमी वेळेत व्हावा, या हेतूने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाची निर्मिती करण्यात आली. प्रवाशांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेला हा महामार्ग आता जणू मृत्यूचा सापळाच बनल्याचे अलीकडील काही दिवसांत झालेल्या अपघातांच्या घटनांवरून दिसून येत आहे. यामध्ये बुधवारच्या सकाळी घडलेल्या आणखी एका भीषण अपघाताची भर पडली आहे.
मुंबई, ठाणे येथील रहिवासी विकास कुमार वय 28 वर्षे, गुड्डू सिंग वय 28 वर्षे, प्रदीप सुरेश चव्हाण वय 38 वर्षे, मनीष कुमार प्रेमचंद सिंग वय 28 वर्षे व नितेश कुमार वय 28 वर्षे हे नवीनच घेतलेल्या इर्टिगा एम. एच. 04 एम. एच. 8808 क्रमांकाच्या कार ने नागपूर कॉरीडोरवरून बिहारकडे जात होते. 23 एप्रिलच्या सकाळी 6:15 वाजता दरम्यान लोणार तालुक्यातील सुलतानपूर जवळ चॅनेल नंबर 299.1 वर कार आली असता चालकाला झोपेमुळे डूलकी आली. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटून भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रीत होऊन डिवायडरला धडकली व त्यानंतर कार तीस मिटर घासत जावून समोर असलेल्या पुलाच्या काठड्याला धडकली. यामध्ये कार चालक विकास कुमार व त्याच्या सोबत समोर बसलेला गुड्डू कुमार घटनास्थळीच ठार झाले तर कारमध्ये बसलेले प्रदीप चव्हाण, मनीष कुमार, नितेश कुमार हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने जखमींना मेहकर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.