वाशिम : अनेक महिन्यांपासून मंदीच्या छायेत असलेल्या सोयाबीन बाजाराला अखेर तेजीचे दिवस आले असून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दराने साडेसहा हजारांचा टप्पा पार केला आहे. ६ मे रोजी बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ६०१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.

भाववाढीने बाजारात तेजी; मात्र बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित
वाशिम : अनेक महिन्यांपासून मंदीच्या छायेत असलेल्या सोयाबीन बाजाराला अखेर तेजीचे दिवस आले असून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दराने साडेसहा हजारांचा टप्पा पार केला आहे. ६ मे रोजी बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ६०१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.
हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला केवळ ४ ते ५ हजार रुपयांदरम्यान भाव मिळत होता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी दिसून येत असून बुधवारी सोयाबीनला ६ हजार १५० ते ६ हजार ६०२ रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला माल विक्रीसाठी बाजारात आणला. परिणामी बाजार समितीतील आवकेतही वाढ झाल्याचे दिसून आले. तथापि, या भाववाढीचा फायदा बहुतांश शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. कर्जफेड, शेतीचा खर्च, लग्न, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर आर्थिक गरजांमुळे अनेक शेतकऱ्यांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कमी दरात सोयाबीन विकावे लागले होते. त्या वेळी हमीभावाच्या आसपास दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी साठविलेला माल बाजारात काढला. आता दर वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या घरात विक्रीसाठी मालच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. ‘भाव वाढून आता काय उपयोग? सोयाबीन आधीच विकून गेले,’ अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. काही शेतकऱ्यांनी मात्र दर वाढीची शक्यता ओळखून माल साठवून ठेवला होता. अशा शेतकऱ्यांना सध्याच्या तेजीचा फायदा होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली आहे. तेल उद्योग, पशुखाद्य उद्योग तसेच निर्यात क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे बाजारात तेजी कायम आहे. दुसरीकडे उपलब्ध साठा कमी होत असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, वाशिम बाजार समितीत वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बाजाराकडे पावले वळू लागली असून पुढील काही दिवस बाजारातील तेजी कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
५ हजार १०० क्विंटल आवक
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ मे रोजी सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार १५० ते ६ हजार ६०२ रुपयांपर्यंत दर मिळाला. बिजवाई सोयाबीनला ६ हजार ५०० ते ७ हजार ४२५ रुपयांचा भाव मिळाला असून एकूण ५ हजार १०० क्विंटल आवक नोंदविण्यात आली.


