जालना : स्वभावाने अत्यंत शांत आणि गुणधर्माने बिनविषारी मात्र अतिविषारी घोणस सापासारखा दिसणारा दक्षिण अमेरिकेतील ‘कॉमन बोआ’ जातीतील साप जालना शहरात आढळून आला आहे. दरम्यान, सर्पमित्र रामेश्वर शहा यांनी या सापाचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडले. बुधवार, 10 सप्टेंबर रोजी या सापाला वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या स्वाधीन करण्यात आले.

विनोद काळे / जालना : स्वभावाने अत्यंत शांत आणि गुणधर्माने बिनविषारी मात्र अतिविषारी घोणस सापासारखा दिसणारा दक्षिण अमेरिकेतील ‘कॉमन बोआ’ जातीतील साप जालना शहरात आढळून आला आहे. दरम्यान, सर्पमित्र रामेश्वर शहा यांनी या सापाचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडले. बुधवार, 10 सप्टेंबर रोजी या सापाला वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या स्वाधीन करण्यात आले.
जालना येथील औद्योगिक वसाहतीमध्ये घोणस सारखा दिसणारा साप आढळून आल्याचा फोन सर्पमित्र रामेश्वर शहा यांना आला होता. त्यांनी तत्काळ औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करून या सापाला पकडले. दरम्यान, हा साप अत्यंत दुर्मिळ असून तो भारतात सहसा आढळत नाही. कारण या सापाचा मूळ अधिवास हा दक्षिण अमेरिकेतील बेटांवर असल्याचे निरीक्षण सर्पमित्र रामेश्वर शहा यांनी नोंदवले. त्यांनी या सापाबद्दल माहिती देताना सांगितले की, हा साप अत्यंत शांत स्वभावाचा आणि वजनाने स्थूल आहे. विशेष म्हणजे हा साप बिनविषारी असल्याचे त्यांनी सांगितले. हा छोटा अजगर प्रजातीतील असल्याचेही ते म्हणाले. हा साप तपकिरी रंगांचा असून त्याचा अंगावर वर्तुळाकार ठिबके आहेत. त्याचे तोंड निमुळते असून तो शिकारीला घट्ट आवळून घेतो. अटॅक करताना तो घोणस सापासारखा किंवा अजगराप्रमाणे तोंड आणि शरीराच्या समोरच्या भागाचा एस सारखा आकार करून शिकारीला भक्ष्य बनवतो. दरम्यान, बुधवारी या सापाला सहायक वनसंरक्षक सुदान मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले, वनरक्षक बालाजी घुले यांच्या स्वाधीन करण्यात आले.
काय आहे कॉमन बोआ
हा एक मोठा, बिनविषारी आणि जड शरीराचा साप आहे.
याला ‘रेड-टेल्ड बोआ’ असेही म्हणतात.
याची मागील बाजूस गडद, सॅडल-आकाराचे नमुने असतात आणि शेपूट अनेकदा लाल तपकिरी रंगाची असते. प्रौढ बोआ ३ मीटर ( ८- १० फूट ) पर्यंत वाढू शकतात. हा साप उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळतो. बेडूक, उंदीर, सरडा आदी छोटे प्राणी याचे भक्ष्य आहेत.
वन्य जीव बचाव दलाकडे सोपविणार
हा अतिशय दुर्मिळ साप असून दक्षिण अमेरिकेत आढळून येतो. याला ‘बोआ कॉन्स्ट्रिक्टर’,
‘रेड टेल्ड बोआ’ किंवा कॉमन बोआ असे म्हटले जाते. दरम्यान, या सापाला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी वन्य जीव बचाव दलाकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत. त्याच्यावर पुढील उपचार केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्याच्या संरक्षणाची योग्य कारवाई केली जाईल.
» नीता फुले, वनपरिक्षेत्र अधिकारी,उत्तर वनविभाग, जालना.
