जालना : वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे जालना शहरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा मिळणे दुरापास्त झाले आहे. दरम्यान, सोमवार, 31 मार्च रोजी पहाटे पाच वाजेपासून जुना जालना भागातील शंकर नगरसह काही भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

जालना : वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे जालना शहरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा मिळणे दुरापास्त झाले आहे. दरम्यान, सोमवार, 31 मार्च रोजी पहाटे पाच वाजेपासून जुना जालना भागातील शंकर नगरसह काही भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सणासुदीमुळे काही भागातील फिडरवर ओव्हरलोड झाल्यामुळे या भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जालना शहरातील काही भागातील विशेषतः जुना जालना भागातील मोतीबाग, एमआयडीसी सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होणे, एक फ्यूज गायब होणे, तासनतास वीज पुरवठा खंडित होणे यासारखे प्रकार नेहमीच होतात. याबाबत मोतीबाग आणि एमआयडीसी येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर या भागातील फिडरवर ओव्हरलोड येत असल्यामुळे आणि वितरण व्यवस्था जुनी झाल्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड होतो, असे काही उत्तरे दिली जातात. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आणि कमी अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांची विद्युत उपकरणे खराब होत आहे. यामुळे वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सणासुदीचे कारण कुचकामी
सोमवारी पहाटे पाच वाजता बंद करण्यात आलेला वीज पुरवठा साखळी सव्वा दहा वाजता सुरु करण्यात आला. याबाबत वीज वितरण कंपनीच्या फ्यूज कॉल सेंटरवर विचारणा केली असता सणासुदीमुळे ओव्हर लोड आल्यामुळे काही भागातील पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसी केंद्राचे अभियंता बनकर यांनी देखील हेच कारण सांगितले. मात्र, सणासुदीमुळे ओव्हर लोड होणे आणि त्यासाठी इतर भागातील वीज पुरवठा बंद ठेवणे, हे कारण संयुक्तिक वाटत नाही.
पुरवठा सुरु करण्यास सांगतो : संतोष अधिकार
शंकर नगरमध्ये पहाटे पाच वाजेपासून वीज पुरवठा बंद असल्याबाबत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संतोष अधिकार यांना विचारले असता ते म्हणाले, या भागात ओव्हरलोड होत असल्यामुळे पुरवठा बंद करण्यात आला आहे. पुरवठा सुरु करण्यास सांगतो.