Robbery of a businessman: बॅंकेत रक्कम भरणा करण्यासाठी जाणाऱ्या पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकास मारहाण करून ११ लाख रुपये लुटल्याची घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील महालगाव येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेत पंप व्यवस्थापकानेच दोघां चुलत भावांच्या मदतीने लुटीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
वैजापूर : बॅंकेत रक्कम भरणा करण्यासाठी जाणाऱ्या पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकास मारहाण करून ११ लाख रुपये लुटल्याची घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील महालगाव येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेत पंप व्यवस्थापकानेच दोघां चुलत भावांच्या मदतीने लुटीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाखांची रोकड जप्त केली असून वीरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख सुनील धारबळे (पंप व्यवस्थापक), प्रशांत बाळू धारबळे व दीपक आप्पासाहेब धारबळे (सर्व रा. कनकसागज ता. वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गावरील तालुक्यातील महालगाव येथे एचपी पेट्रोलपंप असून, या पंपावर कनकसागज येथील गोरख धारबळे हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास तो पेट्रोल व डिझेल विक्रीच्या माध्यमातून दोन दिवसांत जमा झालेली ११ लाख ३४ हजार २०० इतकी रोकड घेऊन महालगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दुचाकीने जात होता.
यावेळी वैजापूरकडून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी त्याच्या डोळ्यात मिर्ची पूड फेकून त्याच्याजवळील ११ लाख ३४ हजार २०० रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. या आशयाचे कथन गोरख धारबळे याने पोलिसांसमोर केले. यानंतर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तपसादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. परंतु यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. त्यामुळे की काय घटनेच्या पहिल्या दिवसापासून पोलिसांची संशयाची सुई ही गोरखभोवतीच फिरत होती. परंतु घटनेनंतर गोरख शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.
२९ मे रोजी सायंकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची कसून चौकशी केली. दरम्यान पैशांच्या अडचणीमुळे चुलत भाऊ प्रशांत व बाळू धारबळे यांच्यासोबत मिळून आपण हा चोरीचा बनाव केल्याची कबुली त्याने दिली. लगेचच पोलिसांनी त्या दोघांना कनकसागज येथून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी दरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या बॅगेसह १० लाख ५ हजार ६०० रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सपोनि सुधीर मोटे, पोलीस अंमलदार नामदेव शिरसाठ, दीपक नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगश तरमळे, संजय तांदळे यांच्या पथकाने केली.