अंढेरा : बायगाव बुद्रुक येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या सशस्त्र दरोड्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान या घटनेतील एक आरोपीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

अंढेरा : बायगाव बुद्रुक येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या सशस्त्र दरोड्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान या घटनेतील एक आरोपीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
माहितीनुसार, गट क्रमांक २११ मधील शेतातील घरांवर दरोडेखोरांनी मध्यरात्री सुमारे १ वाजता धाड टाकली. सुरुवातीला त्यांनी ताकतोडे कुटुंबीयांना लक्ष्य केले. घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या कानाशी चाकू लावत “दार उघड, नाहीतर जीव जाईल” अशी धमकी देत घरात घुसले. आत घुसताच त्यांनी संपूर्ण कुटुंबाला जागे करून मोबाईल हिसकावले आणि मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले.
दरोडेखोर इतक्यावरच थांबले नाही. तर,त्यांनी लगेच शेजारील सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्तू विष्णू खरात यांच्या घरावर धाड टाकली. खरात कुटुंबीयांच्या गळ्यावर चाकू ठेवत “सगळं द्या नाहीतर परिणाम वाईट होतील” अशी धमकी देत घरातील मंगळसूत्र, कुडके, डोरले, सोनं-चांदी आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला. दोन्ही घरांमधून मिळून तब्बल ५लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, एका धाडसी महिलेने प्रसंगावधान राखत गावात फोन लावला आणि क्षणात गाव जागे झाले.संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. स्वतःचा जीव धोक्यात घालून गावकऱ्यांनी चोरट्यांना कोंडीत पकडले.
पळून जाण्याच्या प्रयत्नात एक दरोडेखोर छतावरून उडी मारताना जखमी झाला आणि मोटारसायकलसह गावकऱ्यांच्या हाती सापडला. त्यानंतर उर्वरित आरोपींचा शोध घेणे चालू आहे काही वेळातच एका आरोपींना अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३३३, १२७(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी एसडीपीओ मनीषा कदम यांनी भेट देत पाहणी केली.
गावकऱ्यांचे धाडस ठरले निर्णायक!
या थरारक घटनेत ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटी व धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा हा दरोडा आणखी भीषण ठरला असता. सध्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा असून गावकऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
