वाशिम : रिसोड तालुक्यातील मोप गावाजवळ लोणारकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्विफ्ट डिझायर कार अडवून रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना मारहाण करत २२ हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. या दरोड्याच्या तपासातून विवाह फसवणूक व अपहरणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तपासात असे निष्पन्न झाले की, आसेगावपेन (जि. वाशिम) येथील दीपक खानझोडे यांचा विवाह १० डिसेंबर रोजी झाला होता. विवाहासाठी दोन लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याच्या संशयातून १३ डिसेंबर रोजी काही जणांनी खानझोडे यांच्या वडिलांचे अपहरण केले. मुलगी परत आणली नाही तर ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याच टोळीने मोप गावाजवळ दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलिसांची पथके अहिल्यानगर, संभाजीनगर व जालना येथे रवाना झाली. अहिल्यानगर येथून अपहृत सिताराम खानझोडे यांची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच राहुल दिलीप म्हस्के, सतीश विनायक जाधव, आकाश छगन गायकवाड यांच्यासह नवरी व एजंट शांताराम खराटे यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, अशी माहिती १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत एसपी अनुज तारे यांनी दिली.