छत्रपती संभाजीनगर : धुलिवंदनच्या दिवशी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा रक्षकांकडून “वरून आदेश आहेत” असे सांगत विद्यार्थिनींना वसतिगृहाच्या गेटबाहेर जाऊ दिले जात नसल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली.

छत्रपती संभाजीनगर : धुलिवंदनच्या दिवशी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा रक्षकांकडून “वरून आदेश आहेत” असे सांगत विद्यार्थिनींना वसतिगृहाच्या गेटबाहेर जाऊ दिले जात नसल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली.
आज धुलिवंदन असल्याने परिसरातील सर्व मेस बंद आहेत. विशेष म्हणजे मुलींच्या वसतिगृह परिसरात एकही कॅन्टीन उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थिनी सकाळपासून उपाशी असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पर्याय म्हणून प्रशासनाने गेस्ट हाऊस कॅन्टीनचा संपर्क क्रमांक दिला मात्र तेथील जेवणाची गुणवत्ता समाधानकारक नसून ऑर्डर वेळेत मिळत नसल्याची विद्यार्थिनींची नाराजी आहे. गेस्ट हाऊस कॅन्टीनमध्ये केवळ चार कर्मचारी असून ते सर्व वसतिगृहातील मुलींसाठी पुरेशी आणि दर्जेदार जेवणव्यवस्था करू शकतील का, असा सवालही उपस्थित होत आहे आणि मुलींना पाहिजेत ते खाद्यपदार्थ देखील मिळत नाहीत.
धुलिवंदनचा सण दुपारपर्यंत आटोपल्यानंतरही सायंकाळी विद्यार्थिनींना बाहेर जाऊ दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे “वसतिगृहाचे रूपांतर कारागृहात झाले आहे का?” असा संतप्त प्रश्न विद्यार्थिनी विचारत आहेत.
दरम्यान, वसतिगृहाचे वॉर्डन फोन उचलत नसल्याची तक्रार आहे. चिफ रेक्टर यांनी “परिस्थितीची माहिती नाही” असे सांगितल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. सुरक्षा विभागाचे इन्चार्ज “वरून आदेश आहेत” एवढेच उत्तर देत आहेत, तर कुलसचिवांनी फोन करू नये असे सांगितल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आला आहे.
मुलामुलींसाठी वेगवेगळे नियम का लागू केले जात आहेत? मुलांच्या वसतिगृहावर असेच निर्बंध आहेत का? विद्यार्थिनींच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून त्यांना उपाशी ठेवणे कितपत योग्य आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या नावाखाली स्वातंत्र्यावर बंधने घालण्याऐवजी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मुलामुलींच्यासाठी वेगळे नियम कसे होऊ शकतात असा प्रश्न देखील मुलींनी उपस्थित केला.
