मेहकर : मेहकर तालुक्यातील अकरा परिमंडळांमध्ये गेल्या वीस तासात अतिवृष्टी सदृश पाऊस बरसल्याने पेरणी केलेल्या शेतांमध्ये तलावासारखे पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मेहकर : मेहकर तालुक्यातील अकरा परिमंडळांमध्ये गेल्या वीस तासात अतिवृष्टी सदृश पाऊस बरसल्याने पेरणी केलेल्या शेतांमध्ये तलावासारखे पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
25 जून रोजी सायंकाळी सुरू झालेला संततधार पाऊस 26 जून च्या दुपारपर्यंत सुरूच होता. रात्रभर पावसामध्ये कुठलाही खंड पडला नाही. तालुक्यात जवळपास ७० टक्के भागात खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्याभरात पाऊस न पडल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाही. जानेफळ, डोणगाव, शेलगाव देशमुख, अंत्री देशमुख, बोरी ,कल्याणा, दुधा,मोहना आदी नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची गैरसोय होण्याबरोबरच मोठे नुकसानही झाले आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये १०० मीटर पर्यंत पसरले असल्याचे दिसून आले. ज्या शेतांमध्ये पेरणी झाली आणि तलाव सदृश पाणी साचलेले आहे त्या त्या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे भाग पडणार असल्याचे दिसते.
आ. खरातांनी शहरातील भागाची केली पाहणी
शहरात अतिवृष्टीमुळे नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरही पाणी वाहत होते. आ. सिद्धार्थ खरात यांनी मुख्याधिकारी राम कापरे आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहराच्या विविध भागाची 26 जून रोजी पाहणी केली. साचून असलेला कचरा त्वरित उचलण्यात यावा, त्याचप्रमाणे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
शेलगाव देशमुख परिसरात सर्वाधिक पाऊस
मेहकर परिमंडळात ९३ मिलिमीटर पाऊस झाला असून हिवरा ६६.६ ,शेलगाव देशमुख ११७ , डोणगाव ९३ , देऊळगाव साकर्षा ६५.३, वरवंड ७२ मिलिमीटर , लोणी लव्हाळा ८२.५ , अंजनी बुद्रुक ९३ , नायगाव ९३ मिलिमीटर आणि कल्याणा ९२.५ मिलीलीटर पाऊस झाला आहे. तालुक्याची आतापर्यंतची पावसाची सरासरी १६४.४ असून काल रात्री व आज दुपारपर्यंत सरासरी ९० मिलिमीटर पाऊस पडला आहे. शेलगाव देशमुख परिसरात सर्वाधिक पाऊस बरसला.