काठमांडू : नेपाळमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर सोशल मीडिया पुन्हा सुरू करण्यात आला. या निदर्शनात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या निदर्शनाचे नेतृत्व जेन-झी म्हणजेच १८ ते ३० वयोगटातील तरुणांनी केले होते.

काठमांडू : नेपाळमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर सोशल मीडिया पुन्हा सुरू करण्यात आला. या निदर्शनात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या निदर्शनाचे नेतृत्व जेन-झी म्हणजेच १८ ते ३० वयोगटातील तरुणांनी केले होते.

सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारी भ्रष्टाचाराविरुद्ध सोमवारी सकाळी १२ हजारांहून अधिक निदर्शक तरुण संसद भवनाच्या आवारात घुसले, त्यानंतर लष्कराने गोळीबार केला. नेपाळच्या इतिहासात संसदेत घुसखोरीची ही पहिलीच घटना आहे. निदर्शकांनी संसदेच्या गेट क्रमांक १ आणि २ वर कब्जा केला होता. त्यानंतर संसद भवन, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान निवासस्थानाजवळील भागात कर्फ्यू लागू करण्यात आला. काठमांडू प्रशासनाने तोडफोड करणाऱ्यांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत.
काठमांडूमध्ये संचारबंदी लागू
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन सुरु केले. नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. संसद भवनासोबतच, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली.
नेपाळमध्ये 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी
3 सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्टपासून सात दिवसांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली.
