भोकरदन : लग्नाचे आमिष दाखवून बनावट आधार कार्डच्या माध्यमातून तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यात उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्याने ‘मामा’ बनून सोयरीक जुळवली, तोच नवरीचा खरा नवरा असल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

भोकरदन : लग्नाचे आमिष दाखवून बनावट आधार कार्डच्या माध्यमातून तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यात उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्याने ‘मामा’ बनून सोयरीक जुळवली, तोच नवरीचा खरा नवरा असल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
ग्रामीण भागात उपवर तरूणांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बननेला आहे. मुलींच्या व आई-वडीलांच्या अपेक्षा वाढल्याने मुलांचे लग्न जूळण्यास मोठे अडथळे येत आहे. परिणामी तीस, पस्तीशी पार केलेल्या अविवाहित तरूणांची संख्या वाढत चालली आहे. याचाच गैर फायदा घेणाऱ्या काही टोळ्या सक्रीय असून बनावट मुलगी, नातेवाईक उभे करून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळ्यांचे कारनामे वाढले आहे. असाच एक प्रकार भोकरदन तालुक्यात समोर आला आहे. तालुक्यातील नळणी खुर्द येथील ३३ वर्षीय कृष्णा नामदेव देठे यांचा विवाह जमवण्यासाठी दीपक सिमोन शेळके, दांगडे मावशी, कल्याण घाडगे आणि संतोष मोरे यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी प्रियंका मनोज संन्यासी नावाच्या मुलीशी कृष्णाचे लग्न ठरवले. या बदल्यात मध्यस्थांनी ४ लाख रुपये रोख आणि लग्नासाठी ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले. २१ जानेवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर १५ दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र, प्रियंकाच्या वागण्यावरून संशय आल्याने फिर्यादी कृष्णा देठे यांनी तिला आधार केंद्रावर नेले. तिथे तपासणी केली असता, प्रियंकाचे खरे नाव ‘प्रियंका दीपक शेळके’ असल्याचे आणि तिचा विवाह आधीच दीपक शेळके याच्याशी झाला असल्याचे उघड झाले. सोयरीक जुळवणारा दीपक हा नवरीचा मामा नसून तिचा खरा पती असल्याचे समोर येताच नवरदेवाला मोठा धक्का बसला. याप्रकरणाची तक्रार प्राप्त होताच भोकरदन पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दीपक सिमोन शेळके आणि नवरी प्रियंका दीपक शेळके दोघेही रा.पडेगाव, छत्रपती संभाजीनगर यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
