Prakash Ambedkar’s Public Meeting at Kurankhed (Akola) : विधानसभा निवडणुकीत राज्यातील ३२ मतदारसंघांतील मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळतील, अशी चिंता काँग्रेससह महाविकास आघाडीला वाटत असून, त्यांच्या पायांखालची वाळू सरकत असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे डागले.
अकोला : विधानसभा निवडणुकीत राज्यातील ३२ मतदारसंघांतील मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळतील, अशी चिंता काँग्रेससह महाविकास आघाडीला वाटत असून, त्यांच्या पायांखालची वाळू सरकत असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे डागले.
जिल्ह्यातील मूर्तिजापूर व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कुरणखेड येथील आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत सांगतात की, आमच्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली; मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या त्याच शिवसेनेला मुस्लीम समुदायाने मतदान केल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले. राज्यातील ३२ जागी ‘वंचित’ला संधी दिल्यास अडकून पडलेले महंमद पैगंबर बिल आम्ही पास करून दाखवू, असे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सुगत वाघमारे, ज्ञानेश्वर सुलताने, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड, युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, मिलिंद इंगळे आदी उपस्थित होते.
‘हमीभाव कायद्यासाठी आम्ही आग्रही!’
हमीभावाचा कायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, असे प्रतिपादन अॅड. आंबेडकर यांनी केले. विधानसभेत हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही असून, व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करतो; मात्र कठोर कायदा केल्यास अशी हिंमत भविष्यात कोणी करणार नाही, असे सांगत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देण्यास शासनाला हरकत काय, असा सवालही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
विहीरींच्या निधीत ३० टक्के कपात, ह्यांची विद्वत्ता
हमीभावाच्या कायद्यावर बोलत असताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विदर्भातील विहीरी वाटपात आमदार रणधीर सावरकर यांना टोला लगावला. रणधीर सावरकर हे विद्वान आहेत. प्रचंड विद्वान आहेत. त्यांची प्रचंड विद्वानता त्यांनी सभागृहात दाखवली. त्यांनी शासन जे विदर्भात विहीर वाटप करतात त्या कशा ३० टक्क्यांनी कमी करता येतील याची मांडणी त्यांनी केली. त्यामुळे 3 वर्षांपूर्वी विहरीसाठी मिळणारा निधी आणि आताचा निधी यात ३० टक्के कपात झाली असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.