जालना : येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘दुःखी’ राज्य काव्य पुरस्कार यंदा ठाणे येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

जालना : येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘दुःखी’ राज्य काव्य पुरस्कार यंदा ठाणे येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे २८ वे वर्ष असून २५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर ‘ना. धों. महानोर राज्य पुरस्कार’ मुंबई येथील कवयित्री व ललित लेखिका मीनाक्षी पाटील यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे आहे.

या दोन्ही पुरस्कारांचे वितरण गुढीपाडव्याच्या दिवशी, गुरुवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता जालना येथे होणाऱ्या ‘कवितेचा पाडवा’ या लोकप्रिय साहित्यिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची काव्यमैफलही रंगणार आहे.
या पुरस्कारांची घोषणा रविवार, ८ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका व कवयित्री डॉ. संजीवनी तडेगांवकर तसेच अनुभव प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव तडेगांवकर उपस्थित होते.
या पुरस्कारांच्या माध्यमातून राज्यातील दर्जेदार काव्य व साहित्यनिर्मिती करणाऱ्या कवी-साहित्यिकांचा गौरव करण्यात येतो. यापूर्वी बलवंत धोंगडे, वृषाली किन्हाळकर, कैलास भाले, फ.मु. शिंदे, स्व. भगवान देशमुख, रामदास फुटाणे, इंद्रजीत भालेराव, निरजा, मनोज बोरगावकर, लोकनाथ यशवंत, विष्णू सूर्या वाघ, राजन गवस, प्रज्ञा दया पवार, अरुणा ढेरे, रेखा बैजल, दासू वैद्य आदी नामवंत कवी व साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्यिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विपूल काव्य, साहित्य संपदा
विनोदी काव्यशैलीसाठी ओळखले जाणारे कवी अशोक नायगावकर यांचे ‘वाटेवरच्या कविता’ (१९९२) आणि ‘कवितेच्या वाटेवर’ (२०२२) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. देश-विदेशात त्यांनी काव्यसादरीकरण केले असून त्यांच्या विनोदी आणि खास ‘नायगावकरी’ शैलीतील कविता रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
कवयित्री मीनाक्षी पाटील या कवी, चित्रकार आणि ललित लेखिका म्हणूनही परिचित आहेत. त्यांचे “ इज इट इन युअर डीएनए,
Is It in Your DNA”, हे कवितासंग्रह तसेच “उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता” हा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय “खानदेशी म्हणी व वाक्प्रचार : एक लोकाभ्यास” आणि “साधना डायरी” हे अनुवादित ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.
