Phulumbri Assembly Constituency (Chhatrapati Sambhajinagar): अखिल भारतीय काँग्रेसची पहिली उमेदवार यादी येतात जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपाच्या अनुराधा चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे विलास अवताडे अशी थेट फाईट आता होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय काँग्रेसची पहिली उमेदवार यादी येतात जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपाच्या अनुराधा चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे विलास अवताडे अशी थेट फाईट आता होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे जरांगे पाटलाच्या उमेदवाराची आता मतदारांना उत्सुकता आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथा काळे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे इच्छुक होते. या दोन्ही दावेदारांनी वरिष्ठ पातळीवर उमेदवारी मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर गुरूवारी रात्री उशीरा काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत औताडे यांनी डॉ. कल्याण काळे यांचे काम केल्याने त्यांच्या पदरात उमेदवारीची माळ पडल्याची चर्चा आहे. औताडे यांच्या उमेदवारीमुळे आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अनुराधा चव्हाण विरूध्द काँग्रेसचे विलास औताडे अशी थेट फाईट होणार आहे.
भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी यापूर्वी याच मतदारसंघातून निवडणुक लढवून ३२ हजार मतदान घेतले होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सभापती म्हणून मतदारसंघात काम केले आहे. फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणूनही तालुक्यात संपर्क ठेवला आहे. तर औताडे यांनी यापूर्वी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. यावेळी ते पक्षाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या पाठींशी खंबीरपणे उभे होते. परिणामी मराठवाड्यात जालना मतदारसंघातून डॉक्टर काळे यांचा विजय झाला या विजयाचे फलित म्हणून अवताडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पाडल्याची चर्चा आहे.
मात्र अवताडींसाठी पुढची लढाई सोपी नसून फुलंब्रीत अटीतटीची निवडणूक होण्याचे संकेत आहेत.