Parli Assembly Constituency : बीड जिल्हयातील परळी विधानसभा मतदारसंघात १२२ गावे अतिसंवेदनशील घोषित करून, सीसीटीव्ही कॅमेरे व एसआरपीएफच्या सुरक्षेत मतदान घेण्याची विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्हयातील परळी विधानसभा मतदारसंघात १२२ गावे अतिसंवेदनशील घोषित करून, सीसीटीव्ही कॅमेरे व एसआरपीएफच्या सुरक्षेत मतदान घेण्याची विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या संदर्भाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी व न्या. संतोष चपळगावकर यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकेनुसार परळीचे तहसीलदार वैजीनाथ मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे नातेवाईक असून त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिकारी असलेले जिल्हाधिकारी यांचा चार वर्षंपेक्षा जास्त कार्यकाळ झाल्याने आदर्श निवडणूक प्रक्रियेअंतर्गंत त्यांचीही इतरत्र बदली करण्याची विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आणि परळी येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले ॲड. माधवराव जाधव यांनी ॲड. वसंतराव साळुंके यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी १४ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी निवडणूक आयोग, मुख्यमंत्री, बीड जिल्हाधिकारी आदींकडे तक्रार दाखल केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात परळी व अंबाजोगाई तालुक्यातील २३० गावांचा समावेश असून परळी तालुक्यातील १२२ मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात यावे.
संबंधित अतिसंवदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात यावे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत याचिकेत म्हटले आहे की, निवडणुकीसंबंधीच्या कामकाजाचे प्रमुख यांची चार वर्षे सेवा झालेली आहे. निवडणूक मार्गदर्शक तत्वानुसार तीन वर्षे एकाच पदावर राहिलेल्या अधिकारी यांची बदली करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात तहसिलदार स्थानिक नसावा. परळीचे तहसिलदार वैजीनाथ मुंडे यांचे गाव तालुक्यातील सारडगाव हे आहे. मंत्री धनंजय मुंडे कुटुंबाशी संबंधित असल्याने त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.