बुलढाणा : प्रतिकुल परिस्थिती असतानाही आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देत, शेगाव तालुक्यातील छोटयाशा गावातून बुलढाण्यात आल्यानंतर वडिलांनी केलेला संघर्ष तिच्या डोळ्यासमोर होता. आपल्याला आयुष्यात वेगळं काहीतरी बनायचं, ही खुणगाठ मनाशी बांधून ती शिकत होती. अशातच विवाह झाला. मात्र काही दिवसातचं घटस्फोटाचं आभाळासारखं संकट कोसळलं. मात्र कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याचं बालकडू वडिलांपासूनच रक्तात भिणलेल्या ऋतुजाने त्यावर लिलया मात केली. बँकींग क्षेत्रात उंच भरारी घेत अखेर आपलं ध्येय गाठलं. कठोर परिश्रमाअंती या संघर्ष कन्येने बँक क्रेडिट ऑफीसर या महत्वाच्या पदावर आपल्या संघर्षाची मोहोर उमटवली.

पृथ्वीराज चव्हाण/ बुलढाणा : प्रतिकुल परिस्थिती असतानाही आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देत, शेगाव तालुक्यातील छोटयाशा गावातून बुलढाण्यात आल्यानंतर वडिलांनी केलेला संघर्ष तिच्या डोळ्यासमोर होता. आपल्याला आयुष्यात वेगळं काहीतरी बनायचं, ही खुणगाठ मनाशी बांधून ती शिकत होती. अशातच विवाह झाला. मात्र काही दिवसातचं घटस्फोटाचं आभाळासारखं संकट कोसळलं. मात्र कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याचं बालकडू वडिलांपासूनच रक्तात भिणलेल्या ऋतुजाने त्यावर लिलया मात केली. बँकींग क्षेत्रात उंच भरारी घेत अखेर आपलं ध्येय गाठलं. कठोर परिश्रमाअंती या संघर्ष कन्येने बँक क्रेडिट ऑफीसर या महत्वाच्या पदावर आपल्या संघर्षाची मोहोर उमटवली.
वडील अशोकराव दाभाडे हे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी. आई सर्वसामान्य गृहिणी, एक बहिण व भाऊ असा ऋतुजाचा परिवार. प्राथमिक शिक्षण महात्मा ज्योतीबा फुले शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी विद्यालयात व त्यानंतर एडेड महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रीक इंजिनियरिंगची पदवी मिळविली. यानंतर काही तरी करायचं असे विचार सुरू असतानाच साधारणत: मध्यमवर्गीय मुलींचे आई वडील विचार करतात त्याप्रमाणे एक स्थळ आलं म्हणून आई वडिलांनी ऋतुजाचा 2021 मध्ये विवाह उरकला. काही दिवस सगळं सुरळीत असताना अल्पवयात तिच्यावर घटस्फोटाचं संकट कोसळलं. मानसिक ताणतणावात पुढील काही दिवस गेले. मात्र आई वडिल ठामपणे तिच्या पाठीशी उभे होते. भाऊ बहिणींची भक्कम साथ तिला पुन्हा नव्याने उभे राहण्याची साद घालत होती. अखेर 2023 मध्ये ऋतुजाने छत्रपती संभाजीनगर येथे बँकींग परिक्षेची तयारी करून घेणाऱ्या एका प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. प्रशिक्षणादरम्यान बँकींग क्लर्कचे ध्येय ठेवले. मात्र पुढे ‘व्हायचं तर अधिकारीचं..’ अशी जिद्द मनाशी ठेवून फक्त अभ्यास हेच जीवन अशी स्वत:ची जीवनशैली बनविली. कठोर मेहनत, शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन आणि आपल्या वर्ग मित्र, मैत्रिणींसोबत अभ्यास याच एकमेव विषयावर चर्चा करत ऋतुजाच्या अविरत संघर्षाने क्रेडिट ऑफीसर पदाचे खडतर यशोशिखर गाठले. तिचा हा जीवन प्रवास नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या युवक, युवतींसाठी मार्गदर्शक ठरतो आहे.
