डोणगाव : ‘लेकराचे हित वाहे माउलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती..’ संत तुकाराम महराजांच्या या ओळी मातृत्वाची परिभाषा पटवून देतात. रविवारी देशभरात मातृ दिन साजरा करण्यात आला.

डोणगाव : ‘लेकराचे हित वाहे माउलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती..’ संत तुकाराम महराजांच्या या ओळी मातृत्वाची परिभाषा पटवून देतात. रविवारी देशभरात मातृ दिन साजरा करण्यात आला. आज आपण परिचारिका दिन साजरा करत आहोत. संत तुकाराम महाराजांनी जे मातृत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेच मातृत्व परिचारिका आणि रुग्ण या दोघांच्या नात्यातून झळकते. रुग्णालयात दुखापत, व्याधी, आजारपणा किंवा गर्भारपणाशी झुंजताना परिचारिका आईचे कर्तव्य पार पाडतेच ना, परिचारिकेतही एक मातृहृदयच दडलेलआहे. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका विविध समस्यांनी त्रस्त आहेत. खाजगी रुग्णालयात तूटपुंजा पगार तर शासकीय रुग्णालयात कंत्राटी नेमणूक, कामाचे ओझे अशा अनेक समस्या आहेत. अनेकदा आंदोलन केली जातात, शासनदरबारी टाहो फोडल्या जातो तरी सुद्धा परिचारिकेचे प्रश्न मार्गी लागत नाही, त्यामुळेच मातृहृदयी परिचारिकेचे दुख: कोण जाणणार? असा सवाल उपस्थित होतो. रुग्णाचा डॉक्टरपेक्षाही जास्त संबंध येतो तो परिचारिकेशी. तीन पाळ्यांमध्ये ड्युटी करताना रुग्णाशी, रुग्णाच्या नातेवाईकांशी आपुलकीचे नाते जोडले जाते. त्यामुळे काहीजण घरच्या अडचणीही या परिचारिकांना सांगून आपले दुःख हलके करतात. परिचारिका एकप्रकारे रुग्णाची आईच असते.
जिल्ह्यातील परिचारिकांची संख्या..
1 हजार लोकसंख्येमागे चार परिचारिका पाहिजेत त्याचे प्रमाण सध्या आपल्याकडे 1.96 असून जे अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी आहे. बुलढाणा जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय अशा विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटी व कायमस्वरूपी अश्या 1400 च्या जवळपास परिचारिका आहेत तर खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या 700 च्या जवळपास परिचारिका आहेत.
समस्या..
शासकीय रुग्णालयामधे ज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय अंतर्गत काम करणाऱ्या परिचारिका यांना कामापेक्षा अतिरिक्त कामांचा ताण अधिक असतो. ऑनलाईन डेटा इंट्री, गृहभेटी.. अशा अनेक कामांचा समावेश आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयात तूटपुंजे मानधन मिळते, यामुळे परिचारिकेच्या समस्या केंद्रीत करण्यासाठी एक मोठी व्यापक संघटना तयार होणे गरजेचे आहे.