dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देश बदलतोय, वाईट दिवस जाणार! : शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी पुन्हा संघटित होण्याची गरज : कपिल पाटील

पुसद : शिक्षक समाज घडविण्याचे काम करतात, त्यामुळेच शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत पोहोचावा यासाठी शिक्षक मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज शिक्षकांचा आवाजच बंद झाल्यासारखी परिस्थिती आहे. शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा संघटित होऊन लढण्याची गरज आहे. देश बदलतोय, वाईट दिवस जाणार, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे माजी आमदार कपिल पाटील यांनी केले.

पुसद येथे शिक्षक भारतीच्या अधिवेशनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुसद : शिक्षक समाज घडविण्याचे काम करतात, त्यामुळेच शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत पोहोचावा यासाठी शिक्षक मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज शिक्षकांचा आवाजच बंद झाल्यासारखी परिस्थिती आहे. शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा संघटित होऊन लढण्याची गरज आहे. देश बदलतोय, वाईट दिवस जाणार, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे माजी आमदार कपिल पाटील यांनी केले.

शिक्षक भारतीच्या पुसद तालुकास्तरीय अधिवेशनात  रविवारी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष सुभाष मोरे, अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने सुरेश देवकर यांच्या ‘निर्धारनामा’चे विमोचन करण्यात आले. कपिल पाटील म्हणाले, महात्मा फुले यांनी सर्वांना शिक्षण द्यावे, शिक्षकांचा सन्मान करावा आणि सक्तीचे व मोफत शिक्षण द्यावे, असा समतेचा विचार मांडला. अमरावतीच्या भूमीतून पंजाबराव देशमुख यांच्यासह संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या समाजजागृती करणाऱ्या महान व्यक्तींनी दिशा दिली. त्याच परंपरेत शिक्षकांनी समाज घडविण्याची भूमिका बजावली आहे. आज शिक्षणाच्या प्रश्नांवर विद्यार्थीही आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करीत आहेत. सरकार खासगी शाळांना प्रोत्साहन देत असताना शिक्षणाची जबाबदारी समाजाने घ्यावी, अशी भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे शिक्षकांनी केवळ स्वतःच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर शिक्षणव्यवस्थेच्या भवितव्यासाठीही जागरूक राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सुरेश देवकर हे उत्तम संघटक असून शिक्षकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. आर्थिक व्यवहारापासून संघटनात्मक कामापर्यंत त्यांना चांगली जाण आहे. सुधारणेची सुरुवात स्वतःपासून करण्याची त्यांची भूमिका आहे. देश बदलत आहे आणि येणारे दिवस चांगले असतील. पुढील सहा महिन्यांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. देवकर सर यांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची आहे, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवि चांदणे यांनी केले. सूत्रसंचालन पंजाबराव चंद्रवंशी यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष प्रथम काळे यांनी मानले.

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची गती मंदावली : सुरेश देवकर

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची गती मंदावली असून विदर्भातील शिक्षक संघटना दुबळ्या झाल्या आहेत. माझे संपूर्ण करिअर शिक्षकांमध्ये गेले असून, काही करायचे असेल तर ते शिक्षकांसाठीच, अशी माझी भूमिका आहे. शिक्षकांचा सन्मान आणि दर्जा कुणीही कमी करू शकत नाही. शिक्षकांनी स्वाभिमानाने व सजगपणे संघटनेच्या सोबत उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर यांनी केले. पेन्शन, नियुक्त्या, अतिरिक्त काम यांसह शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी संघटना बळकट असणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षकाने संघटनेशी प्रामाणिक राहावे. निवडणुकीच्या काळात विरोधकांचाही सन्मान राखत सलोख्याने लढले पाहिजे. संघटनेचा प्रभावी आवाज निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन देवकर यांनी केले.

प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट : सुभाष मोरे

शिक्षकांचे प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत आहेत. अन्यायाविरोधात प्रतिनिधी सभागृहात पाठविले, मात्र त्यांनी शिक्षकांचा आवाज बुलंद केला नाही, अशी खंत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी व्यक्त केली. शिक्षक भारतीने सुरेश देवकर यांचा निर्धारनामा प्रकाशित केला असून, त्यातून शिक्षकांना सन्मान आणि हक्क मिळवून देण्यासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व अनुदानित शाळांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. शिक्षकांना पेन्शन मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असे मोरे यांनी सांगितले. काही संस्थाचालक शिक्षक नसलेल्या बाहेरील व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करीत असल्याचा आरोप करून, शिक्षकांनी मतदार यादी तपासून अशा नावांची पडताळणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. आजचे विद्यार्थी नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे येत असून ‘जेन झी’नेही आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनीही आपल्या हक्कांसाठी जागरूक होऊन संघटित होण्याची गरज आहे, असे मोरे म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top