खुलताबादमध्ये १३ सिलेंडरसह १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करण्याचा प्रकार खुलताबाद शहरातील जुने बस स्थानक परिसरात उघडकीस आला.

खुलताबाद : घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करण्याचा प्रकार खुलताबाद शहरातील जुने बस स्थानक परिसरात उघडकीस आला. सहायक पोलीस अधीक्षक, कन्नड उपविभाग, श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ घरगुती गॅस सिलेंडर, ऑटोरिक्षा, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार व इलेक्ट्रिक वजनकाटा असा सुमारे १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांना खुलताबाद शहरातील जुने बस स्थानक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग केले जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड उपविभागीय पोलीस कार्यालय तसेच खुलताबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली.
कारवाईदरम्यान जुने बस स्थानक परिसरात शेख रऊफ हा घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी गॅस रिफिलिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी घरगुती गॅस सिलेंडर, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रणा आणि वजनकाटा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ संबंधित साहित्य व ऑटोरिक्षा ताब्यात घेतली.
गॅस रिफिलिंगसाठी इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक वजनकाटा वापरला जात असल्याचेही आढळून आले. त्यामुळे घरगुती सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संपूर्ण रिफिलिंग यंत्रणा, वाहन आणि गॅस सिलेंडर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
या कारवाईत एकूण १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेल्या गॅसचा व्यावसायिक कारणासाठी अनधिकृत वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ८४ हजार रुपये आहे.
घरगुती गॅसचे अशा प्रकारे अनधिकृत हस्तांतरण व रिफिलिंग केवळ नियमांचे उल्लंघन नसून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, जीवनावश्यक वस्तू व सेवा अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईतील पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कन्नड उपविभागीय पोलीस कार्यालयाचे पोउपनि अजय पानपाटील, अंमलदार मयुर वाळुंजकर, अमोल गायकवाड, संदिप जोनवाल, योगिता पाटील तसेच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सपोनि संभाजी वडते, पोउपनि राजेश पाटील, पो.ह. ११८९ जाकीर शेख, पोह. १०२ किशोर गवळी, पो.ह. १३६७ सिद्धार्थ सदावर्ते, मपोह. १२०४ सोनाली कुंदे, चा.पो.ह. १४०५ अनिल जाधव आणि पो.कॉ. १७१७ योगेश क्षिरसागर यांचा सहभाग होता.
