माहोरा : सावरखेडा येथे वाळूच्या साठ्यावरून झालेल्या वादातून हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परमेश्वर सोनुने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

माहोरा : सावरखेडा येथे वाळूच्या साठ्यावरून झालेल्या वादातून हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परमेश्वर सोनुने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक सोनुने ( रा. सावरखेडा ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराच्या मागे सुखदेव सोनुने याने बांधकामासाठी वाळू साठवून ठेवली होती. या वाळूमुळे येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने फिर्यादीची आई लिलाबाई यांनी राजू सोनुने यास समज देण्यासाठी संपर्क केला. मात्र, राजू आणि त्याचा भाऊ विजय यांनी त्यांना शिवीगाळ केली. या प्रकाराची पोलिसांत तक्रार देण्यासाठी दिपक सोनुने, त्याची आई लिलाबाई, भाऊ सुधाकर आणि परमेश्वर सोनुने असे चौघेजण जाफ्राबाद पोलीस ठाण्यात आले. याचवेळी राजू सोनुने सुद्धा तेथे आला. त्याने पोलीस ठाण्याबाहेर फिर्यादीच्या आई आणि भावांशी वाद घालून शिवीगाळ केली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही पक्षांना ठाण्याच्या बाहेर काढले. मात्र, गेटबाहेर रस्त्यावर राजू व विजय सोनुने यांनी अचानक हल्ला चढवून दिपक, त्याचे बंधू सुधाकर, परमेश्वर यांना मारहाण केली. या झटापटीत विजय सोनुने याने परमेश्वर सोनुने यांच्या डोक्याच्या मागे विट मारून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेनंतर पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेतले आणि जखमीला ग्रामीण रुग्णालय जाफ्राबाद येथे दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान परमेश्वर सोनुने यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी राजु सुखदेव सोनुने, विजय सुखदेव सोनुने यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास जाफ्राबाद पोलीस करत आहेत.