जालना : शहरातील भोकरदन नाका परिसरात राहणाऱ्या किराणा व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या गुंडांच्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जालना : शहरातील भोकरदन नाका परिसरात राहणाऱ्या किराणा व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या गुंडांच्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंदन बन्सीलाल गोलेच्छा यांचेव राजूर दाभाडी येथे किराणा दुकान आहे. सायंकाळच्या वेळी ते नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून जालना येथे परतत असताना विठ्ठल अंभोरे, अक्षय गाडेकर, राहुल गंगावणे यांनी गोलेच्छा यांना रस्त्यात अडवून पिस्तूलचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 50 लाखांची खंडणी मागून त्यांचे अपहरण केले. जालना येथे त्यांना आणून त्यांच्या वडिलांना पिस्तुलाचा धाक दाखवून 4 लाखांची खंडणी घेतली. उर्वरित 46 लाख रुपये दिले नाही तर संपूर्ण परिवाराला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती. यानंतर गोलेच्छा यांनी 31 मे रोजी सदर बाजार पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान तपास अधिकारी शिंदे यांनी आरोपींकडून 2 पिस्तूल, 2 जीवंत काडतूस, 1 मोटारसायकल, 3 मोबाईल, खंडणीची रक्कम असा 27 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींवर चंदनझिरा, सिल्लोड आदी पोलिस ठाण्यात संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे करीत आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र मिश्र, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती, सहायक पोलिस निरीक्षक उबाळे,पोलिस उपनिरीक्षक दीपाली शिंदे, संजय गवई, भरत ढाकणे, बाबासाहेब हरणे, जैवाळ, म्हस्के, प्रदीप करतारे आदींनी केली.
