MLA Gaikwad’s press conference: महायुतीच्या नेत्यांमुळे माझे मताधिक्य घटले. मी केलेली विकास कामे पाहून आणि माझी प्रगती पाहून जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत माझ्याविरोधात काम केले, असा घणाघाती आरोप आ. संजय गायकवाड यांनी 28 डिसेंबर रोजी ‘मातोश्री’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
बुलढाणा : महायुतीच्या नेत्यांमुळे माझे मताधिक्य घटले. मी केलेली विकास कामे पाहून आणि माझी प्रगती पाहून जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत माझ्याविरोधात काम केले, असा घणाघाती आरोप आ. संजय गायकवाड यांनी 28 डिसेंबर रोजी ‘मातोश्री’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
काही दिवसांपूर्वी आ. गायकवाड यांनी आरोप करीत आ. संजय कुटे आणि केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना लक्ष्य केले होते. दरम्यान, निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद बोलावून पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची 20 हजार मते महाविकास आघाडीला देण्याची पूर्ण तयारी आमच्या काही नेत्यांनी केली होती. यामुळेच माझे मताधिक्य घटले. पण एक गोष्ट मात्र नक्की झाली, मी केलेली विकास कामे यांना सहन झाली नाही, माझ्या प्रगतीचे शत्रू झालेत. सगळे एकत्र आले होते, निवडणुकीत माझ्यासोबत कुणीही नव्हते. माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी निवडून आलो. असे सांगत, पुढे शिवसेनेत उभी फूट पडेल असा याचा अर्थ होत नाही, असे आ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.
विजयराज शिंदे यांची नवी गाडी..
एवढेच नाही, तर काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे भाजपचे विजयराजे शिंदे यांनी माझ्या विरोधात काम करण्यासाठी पाच कोटी घेतल्याचा आरोप करीत ‘त्या’ पैशातून त्यांनी नवीन गाडी खरेदी केली असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या नेत्यांवर आरोप करताना सुरुवातीला त्यांनी भाजपनेते योगेंद्र गोडे यांचेही नाव घेतले.