Mahavikas Aghadi split in Aurangabad East : तीन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने जागा वाटप केल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात फूट पडली आहे. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघात अ. भा. कॉग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : तीन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने जागा वाटप केल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात फूट पडली आहे. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघात अ. भा. कॉग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुस्लीम उमेदवार देणार म्हणून काँग्रेसने ही जागा सोडवून घेतली आणि ऐनवेळी वेगळा उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी मैदानात उतरल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यात प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेल्या एम.के.देशमुख यांची उमेदवारी ऐनवेळी काँग्रेसने बदलली. त्यांच्या जागेवर लहु शेवाळे यांना मैदानात उतरवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधल्या दिवशी हा निर्णय आल्याने सर्व तयारी करून ठेवलेल्या देशमुख यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला फुलंब्री आणि औरंगाबाद पूर्व हे दोन मतदारसंघ आले असतांना त्यांनी एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिली नसल्याचा आरोप होत आहे. मुस्लीम समाजाच्या उमेदवारीसाठी शहरातील गांधी भवन येथे असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली होती.
आता काँग्रेसने लहु शेवाळे यांना अधिकृत उमेदवारी दिली असतांना मित्र पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर बऱ्यापैकी मुस्लीम बहुल असल्याने औरंगाबाद पूर्व मध्ये मुस्लीम समाजाला संधी द्यावी लागेल या शब्दावर काँग्रेसने पूर्व विधानसभा मतदासंघ सोडवून घेतला, मात्र तसे न करता त्यांनी वेगळा उमेदवार दिला. त्यामुळे आपणही उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जिल्हा अध्यक्ष तांगडे यांनी ” दै. महाभूमि ” शी बोलतांना सांगितले.
दुसरीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख राजू वैद्य यांनीही औरंंगाबाद पूर्व मधून उमेदवारी दाखल करून मित्र पक्षाचे उमेदवार लहु शेवाळे यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. यात आता माघार कोण घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मोठ्या पक्षाचे दिग्गज रिंगणात
या मतदारसंघातून भाजपाकडून मंत्री अतुल सावे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा प्रमुख राजू वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, अ.भा. काँग्रेसचे लहु शेवाळे, एमआयएम इम्तियाज जलील आदी दिग्गज नेते मैदानात आहेत. तर दुसरीकडे अपक्ष म्हणून एमआयएमपुढे अडचणी निर्माण करणारे आणि २०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले गफार गादरी यांनीही अपक्ष म्हणून अमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
अपक्ष आणि मराठा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या माजी शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख, झुंजार छावा संघटनेचे अध्यक्ष सुनील कोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी मनोज जरांगे यांचा पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोटकर जरांगे पाटील यांच्या टिममधील असून देशमुख यांनीही पाटलांच्या बैठकांना अनेकवेळा उपस्थिती लावली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तांगडे पाटीलही जरांगे यांच्याशी संपर्क साधून आहेत. विशेष बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक उपोषणावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेतली आहे. जलील हे सुध्दा जरांगे यांच्याशी जवळीक साधून आहेत.त्यामुळे औरंगाबाद पूर्व मध्ये जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घताता याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.