Startups : स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे. सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे. सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप्स सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप्स होते, आज देशात एक लाख 57 हजार स्टार्टअप्स झाले आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप्स क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात 26 हजार स्टार्टअप्स आहेत. देशात सर्वात जास्त महिला संचालक असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी : मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती दिली. राज्यातील स्टार्टअप्सला जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत. जगात देशाला नंबर एक बनविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व स्टार्टअप्स देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप्स : फाल्गुनी नायर
‘नायका’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या की, महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगाच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याने महिलांचे सक्षमीकरण होत आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप्स कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांनी नक्की लाभ घ्यावा, असेही सांगितले.