Lonar Sarovar tourism : सरोवरातील घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, वन विभाग, आणि भारतीय पुरातत्व विभाग कडून कठोर पावले उचलण्यात आली असून यापुढे सरोवरात किंवा धारेवर जाण्यासाठी पर्यटकांना आपले आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे.
लोणार (जि. बुलढाणा) : लोणार सरोवरातील घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, वन विभाग, आणि भारतीय पुरातत्व विभाग कडून कठोर पावले उचलण्यात आली असून यापुढे सरोवरात किंवा धारेवर जाण्यासाठी पर्यटकांना आपले आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. आधार कार्डची झेरोक्स दिल्यानंतरच पर्यटन स्थळी प्रवेश मिळणार आहे. आधार कार्डमुळे आता प्रत्येक पर्यटकाची स्वतंत्र नोंद होणार आहे.
२ ऑगस्ट रोजी शेलू तालुक्यातील अर्जुन रोडगे यांचा सरोवरातील घनदाट जंगलात खून झाला या पूर्वी देखील अनेक अप्रिय घटना सरोवराच्या घनदाट जंगलात घडलेल्या आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेने पोलिस प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी वन्यजीव आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची बेठक घेतली. या बैठकीत अनेक विषयावर सुरक्षेच्या दृष्टिकोणातून चर्चा करण्यात आली. यापुढे धारगेट वरून विना परवानगी आधार कार्डशिवाय आत प्रवेश देऊ नये, प्रत्येकाच्या आधार कार्डची झेरॉक्स व मोबाईल नंबर घेतल्या शिवाय आतमध्ये प्रवेश देऊ नये, विना आधारकार्ड जर कोणी आत जाण्यास जबरदस्ती करीत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले. याशिवाय सरोवरात जाणाऱ्या व्यक्तीला जातांना टोकन देण्यात येईल व परत येतांना ते टोकन जमा करण्यात येणार आहे. अश्या प्रकारच्या सख्त सूचना त्यांना लेखी स्वरुपात देण्यात आल्या आहे. पर्यटन स्थळी कायदा जर कोणी हातात घेत असल्यास त्याची यापुढे गय केली जाणार नसल्याचे निमिष मेहेत्रे यांनी सांगितले. या बैठकीला लोणार बिटचे जमादार संतोष चव्हाण, जमादार संजय जाधव, पो. कॉ. अनिल शिंदे, पुरातत्व विभागाचे एम. टी. एस. मनीष कुमार, प्रिन्स कुमार, अनिल फोलाने, राम मादनकर उपस्थित होते.
सरोवर परिसरातील घटनेनंतर प्रशासन सतर्क
सरोवर परिसरातील खूनाच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन, पुरातत्व विभाग आणि वन्यजीव विभाग अधिक सतर्क झाले आहे. यापुढे पर्यटन स्थळी अशा घटना घडू नये, यासाठी तातडीने बैठक घेऊन सुरक्षेच्या दृष्टिने अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र धारेवर दोन महिन्यांपासून लावण्यात आलेली पोलिस चौकी मात्र अजूनही बंद आहे. ती सुरु करण्यासाठी पोलिस प्रशासनाला मुहूर्त केव्हा सापडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.