Loksabha Election 2024: भावनिक होऊन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जातीच्या नावावर वाहावत गेलो मात्र आता जाती संगे नको माती, आता जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देणाऱ्या उमेदवारालाच प्रथम प्राधान्य देण्याच्या प्रतिक्रीया लोकसभा निवडणुकांच्या पुर्वार्धातच सर्वसामान्य मतदारांतून उमटू लागल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण/ बुलढाणा : जाती संगे माती खुप खाल्ली.. मात्र आता पोट फुगायला आले. जात जात करून नेत्यांची घरे भरली. त्यांच्या पाच दहा पिढ्यांना पुरून उरेल अशी त्यांची गडगंज संपत्ती झाली. मात्र भावनिक होऊन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जातीच्या नावावर वाहावत गेलो मात्र आता जाती संगे नको माती, आता जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देणाऱ्या उमेदवारालाच प्रथम प्राधान्य देण्याच्या प्रतिक्रीया लोकसभा निवडणुकांच्या पुर्वार्धातच सर्वसामान्य मतदारांतून उमटू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. येत्या एक दोन दिवसात सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांचेही चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही गती येईल.त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होईल. तेच तेच मुद्दे, तेच विषय आणि 2014 च्या निवडणुकीत दिलेली तिच आश्वासने यावेळीही मतदारांना एैकावी लागणार का, याची उत्सुकता नव्हे तर, भिती मतदारांना वाटायला लागली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेत मालाला भाव नाही, जिल्ह्यात उद्योग धंद्यांची मोठी वाणवा आहे.
लोकसभा मतदार संघातील अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कडकत्या उन्हाळ्यात सरकारी टँकरच्या भरोशावर रहावे लागते. पात्रता असलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना जिल्ह्यात उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. निवडणुकीच्या मौसमातच आश्वासनांचा धो धो पाऊस पाडला जातो. अनेक स्वप्नांची पेरणी केली जाते मात्र ती कधीच उगवत नाहीत, हे गेल्या अनेक वर्षापासून मातृतिर्थातील मतदार अनुभवत आहे. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये नेत्यांची विविध रूपे बघायला मिळतात.
‘ तुमची साथ मिळाली नाही तर, माझी राजकीय कारकिर्द संपेल.. अशी भावनिक साद घातली जाते.भोळे भाबडे मतदार याला बळी पडून उमेदवाराच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकतात. मात्र निवडून आल्यावर मतदारांच्या प्रश्नासाठी गाडीचे काच खाली करून बोलण्या एव्हढाही वेळ त्यांच्याकडे नसतो, ही वस्तुस्थिती अनेकांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता भावनिक न होता. आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य घडविण्याचा अजेंडा असलेल्या उमेदवारालाच लोकसभेत पाठविण्याची मानसिकता मतदारांमध्ये दिसू लागली आहे. आता मतदारांना कोणता एक राजकीय पक्ष नव्हे तर, त्यांचा ‘पक्ष’ घेणारा विकासनेता हवाय, असे एकुण चित्र आहे.