Lok Sabha Election 2024: बाळासाहेबांच्या शिवसैनिकांसमोर लढतीचे आव्हान!

Balasaheb Thakare
Lok Sabha Election 2024: यंदाची लोकसभा निवडणूक बाळासाहेबांच्या दोन शिवसैनिकात होत असल्याने याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी त्यांना वंचित व अपक्ष उमेदवारांचे सुद्धा कडवे आव्हान आहे.
विनोद सावळे/बुलढाणा : आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकींचा इतिहास पाहिला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात खऱ्या अर्थाने निवडणूकींची रंगत बघावयास मिळाली. मात्र यंदाची लोकसभा निवडणूक बाळासाहेबांच्या दोन शिवसैनिकात होत असल्याने याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी त्यांना वंचित व अपक्ष उमेदवारांचे सुद्धा कडवे आव्हान आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर गत तीन पंचवार्षिकपासून शिवसेनेचा दबदबा कायम राहला आहे. नेहमीच शिवसेनेच्या उमेदवाराला पाठबळ देणाऱ्या या मतदार संघात यावेळी मात्र, परिस्थिती काहीशी वेगळी आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाला. बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकात संभ्रम अवस्था निर्माण होवून येथे सुध्दा दोन गटात शिवसैनिक विभागल्या गेले.
काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांना मानणाऱ्या उबाठा गटाकडे राहणे पसंत केले. तर काहींनी बाळासाहेबांची विचारधारा घेवून चालणारे आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यामुळे साहजिकच दोन गटात विभागलेल्या शिवसैनिकांसमोर पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे. तो म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाकडून खा. प्रतापराव जाधव यांना उमेदवार मिळाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी निश्चित झाली.
लोकसभेची खरी लढत आता बाळासाहेबांच्या दोन शिवसैनिकात होत असल्याने बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना एकमेकांचे तर आव्हान असणार, यात कुठलेच दुमत नाही. मात्र, वंचित व अपक्ष उमेदवारांनी सुध्दा निवडणूक रिंगणात उतरुन आणखी रंगत वाढविली आहे.

वंचितसह अपक्षांनीही वेधले लक्ष

वंचितच्या वतीने वसंतराव मगर यांना लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. तर स्वभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके लोकसभा निवडणूक लढणार आहेत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना एकमेकांसोबत वंचित व अपक्ष उमेदवारांच्या आव्हानाचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या दोन शिवसैनिकांसोबतच वंचित आणि अपक्षा उमेदवारांनी सुध्दा जिल्हावासियांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »