Jalna News : तालुक्यातील रामसगाव येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रॅक्टर ट्रॉली उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी आणि तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने जप्त केले. ही कारवाई सोमवार 20 मे रोजी पहाटे अंदाजे दोन ते तीन वाजे दरम्यान करण्यात आली.
घनसावंगी(जि. जालना) : तालुक्यातील रामसगाव येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रॅक्टर ट्रॉली उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी आणि तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने जप्त केले. ही कारवाई सोमवार 20 मे रोजी पहाटे अंदाजे दोन ते तीन वाजे दरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामहसूल विभागाच्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथून अवैधरित्या वाळूने भरलेल्या दहा ट्रॅक्टर ट्रॉलीज चोरटी वाहतुकीच्या तयारीने एका ठिकाणी लावून ठेवलेल्या असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली होती. यावरुन रामसगाव येथे रात्री 3 वाजेच्या सुमारास जाऊन पथकाने सर्व दहा ट्रॉलीज ताब्यात घेतल्या आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगिता खटावकर यांच्या महसूल पथकाच्या वतीने करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये प्रभारी नायब तहसीलदार आशिष पैठणकर, प्रभारी नायब तहसीलदार राजाराम माळी, मंडळ अधिकारी प्रवीण गजरे तलाठी, पी. बी. मिसाळ, अमोल कोंकटवार, विजय बुचुडे, राजू शेख, ए. बी. शिंदे, संदीप नरुटे, प्रवीण शिनगारे, कृष्णा देशमुख, कोतवाल अमोल उंडे, अमोल काकडे, पांडुरंग गिरे, अशोक शिंदे, अंबादास शरणांगत, रामेश्वर ठाकर व पोलीस कर्मचारी खडेकर अप्पा यांचा सहभाग होता.