छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राबविण्यात येत असलेला ‘स्वप्न तुझे माझे’ हा विवाहपूर्व संवादाचा उपक्रम आहे. यात संवादाद्वारे उपाययोजना होतात. कुटुंब व्यवस्था सक्षम करणारा हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोमवार, 21 जुलै रोजी दिले.

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राबविण्यात येत असलेला ‘स्वप्न तुझे माझे’ हा विवाहपूर्व संवादाचा उपक्रम आहे. यात संवादाद्वारे उपाययोजना होतात. कुटुंब व्यवस्था सक्षम करणारा हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोमवार, 21 जुलै रोजी दिले.
विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. शिवानी डे, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, माविम चे व्यवस्थापक चंदनसिंग राठोड आदींची उपस्थिती होती. बैठकीपूर्वी रहाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘स्वप्न तुझे माझे’ च्या विवाहपूर्व संवाद केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या वाचन कट्टा, हिरकणी कक्ष अशा उपक्रमांचीही पाहणी केली. याप्रसंगी विजया रहाटकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची, योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘स्वप्न तुझे माझे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कुटुंब व्यवस्था सक्षम आणि बळकट करण्यासाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमात विवाहपूर्व संवाद याद्वारे घडवीला जातो.
लग्न ठरण्याआधी दोन्हीकडच्या कुटुंबांना आपापसात भेटून संवाद साधता येतो. यात नवरा मुलगा, मुलगी, सासू, सून, नणंद असे विविध नातेवाईक आपापसात भेटून आपल्या नात्यांबद्दल संकल्पना स्पष्ट करू शकता. त्याद्वारे संभाव्य वाद, ताणतणाव यांचे निराकरण वेळीच होऊ शकते व दोन जणांचा संसार सुखाचा होऊ शकतो, अशी यात संकल्पना आहे. हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे न्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी अधिक माहिती दिली की, महिला आयोग महिलांविषयक तक्रारींची तातडीने दखल घेतो. १७ विविध स्वतंत्र कक्षांद्वारे हे कामकाज चालविले जाते. ती बदल घडवते या उपक्रमांतर्गत देशातील सर्व महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण दिले जाते असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
