लोणार : ‘दैनिक महाभूमि’च्या ब्रम्हास्त्र या सदरामध्ये 15 फेब्रुवारी रोजी ‘लोणार सरोसराच्या नशिबी जागतिक दर्जाच्या समस्या’ या मथळ्याखाली विशेष भाग प्रकाशित केला होता. ‘ब्रम्हास्त्र’चा इम्पॅक्ट 17 फेब्रुवारी रोजी लोणार येथे दिसून आला.

आमदार सिद्धार्थ खरात यांची उच्चस्तरीय बैठक
लोणार : ‘दैनिक महाभूमि’च्या ब्रम्हास्त्र या सदरामध्ये 15 फेब्रुवारी रोजी ‘लोणार सरोसराच्या नशिबी जागतिक दर्जाच्या समस्या’ या मथळ्याखाली विशेष भाग प्रकाशित केला होता. ‘ब्रम्हास्त्र’चा इम्पॅक्ट 17 फेब्रुवारी रोजी लोणार येथे दिसून आला. मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ खरात यांनी लोणार परिसरातील वाढती पाणी समस्या, पर्यावरणीय अडचणी आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी लोणार सरोवर परिसरातील नव्याने उभारलेल्या माहिती केंद्रात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. ही बैठक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माहिती केंद्रात पार पडली. यावेळी लोणार सरोवर संवर्धनासाठी सर्वसमावेशक आराखड्याची घोषणा करण्यात आली.

लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी 370 कोटी संवर्धन प्रकल्पाचे काय झाले? सरोवर आणि परसरातील वाढत्या समस्या, केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार सिध्दार्थ खरात सरोवराच्या संवर्धनाकडे लक्ष देतील का? यासारखे प्रश्न ‘दैनिक महाभूमि’च्या ब्रम्हास्त्र या सदरामध्ये मांडले होते. दरम्यान, या वृत्ताचा प्रभाव बघता आमदार सिध्दार्थ खरात यांनी लोणार सरोवराच्या विकासाकामांचा आढावा घेतला. स्थानिक पातळीवरील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन विविध कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिले. वन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अधिकाऱ्यांकडून लोणार विकास आराखड्याची माहिती घेतल्यानंतर पर्यटक व स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. जुन्या रेस्ट हाऊसजवळील सनसेट पॉईंट विनामूल्य खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या, ज्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जतन
लोणार हे प्राचीन काळापासून हिंदू, जैन, बौद्ध आणि मुस्लिम धर्मीयांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे अधोरेखित करत सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने विविध धर्मीय परंपरांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन उपक्रम व संशोधनपर प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला.
लोणारचा पर्यटन विकास आदर्श ठरेल
लोणार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र व व्यापक आराखडा स्वतः तयार करण्याचा निर्णय आमदार सिद्धार्थ खरात यांनी जाहीर केला. या आराखड्यात शहरातील मुख्य रस्ते व प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण, उद्याने विकसित करणे, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करणे आणि शहराला पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवून देणे यांचा समावेश असेल. लोणारचा पर्यटन विकास आदर्श ठरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
