शिरपूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज सकाळपासूनच शिरपूर परिसर पूर्णतः भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसून आला. जानगीर महाराज संस्थान, बेलसरी महादेव मंदिर तसेच नागनाथ संस्थान येथे दर्शनासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच हजेरी लावली. मंदिर परिसरात “हर हर महादेव”च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.

शिरपूर दुमदुमलं! तीन संस्थानांत भाविकांची गर्दी
शिरपूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज सकाळपासूनच शिरपूर परिसर पूर्णतः भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसून आला. जानगीर महाराज संस्थान, बेलसरी महादेव मंदिर तसेच नागनाथ संस्थान येथे दर्शनासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच हजेरी लावली. मंदिर परिसरात “हर हर महादेव”च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. लांबच लांब रांगा, अभिषेकासाठीची गर्दी आणि भक्तीमय वातावरण पाहता संपूर्ण शिरपूर शिवमय झाल्याचे चित्र दिसत होते.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध संस्था व सेवाभावी व्यक्तींकडून ठिकठिकाणी फराळ व चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जानगीर महाराज संस्थानमध्ये मंजूसिंह गौर यांच्याकडून भाविकांना दूध वितरण करण्यात आले. सारडा यांच्या शेताजवळ राजेश शर्मा व निलेश शर्मा यांच्या वतीने साबुदाणा उसळ देण्यात आली. नागनाथ संस्थान परिसरातही साबुदाणा उसळीची सोय करण्यात आली होती.
अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी चहापानाची सेवा सुरू होती. बेलसरी महादेव मंदिर परिसरात रामसेनेतर्फे साबुदाणा प्रसाद वाटप करण्यात आले, तर सुनील गाभणे यांच्याकडून केळीचे वितरण करण्यात आले. याशिवाय दुचाकी मेकॅनिकल गोरे यांच्या वतीने भाविकांसाठी चहा-पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
सेवाभावी वृत्तीने सुरू असलेल्या या उपक्रमांमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध रांग व्यवस्था, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली होती. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरपूर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दिवसभरात मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतल्याने शिरपूर परिसरात श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी भोलेनाथाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख-शांती नांदो, अशीच भावना भाविकांतून व्यक्त होत होती. हर हर महादेव!
