जालना : चित्रपटात दाखवतात तशा फिल्मी स्टाईलमध्ये आजकाल गुंडांच्या टोळ्या शहरात गुन्हेगारी कृत्ये करताना दिसून येत आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीत जालना शहरातील एका उद्योगपतीच्या पुतण्यावर दहाबारा गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या रात्री घडली. गुंडाकडून केलेल्या या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारीकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

जालना शहरातील स्टील उद्योजक नरेंद्र मित्तल यांचा पुतण्या यश मित्तल याच्यावर दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी रात्री साडेदहाच्या सुमारास संभाजीनगर भागात जीवघेणा हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांनी हा हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. या टोळक्याने यश मित्तलवर लोखंडी रॉड आणि चाकूने वार केला. या हल्ल्यात यश मित्तल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून जालना शहरात गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. पोलिसांचा अजिबात वचक राहिलेला दिसत नाही. अशातच गुरुवारी सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतानाच सणानिमित्त यश मित्तल आणि त्यांची पत्नी साक्षी मित्तल हे नातेवाईकाकडे भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते रात्री मुंडे चौकातून संभाजीनगर येथे घरी चारचाकी वाहनातून पत्नीसह परतत असताना त्यांच्या कारच्या मागून आलेल्या पाच ते सहा दुचाकीवरील दहा ते बारा अनोळखी लोकांनी दुचाकी त्यांच्या घरासमोर आडव्या लावल्या. त्यानंतर काही कळायच्या आत यश मित्तल यांना घरासमोर टोळक्याने मारहाण करायला सुरूवात केली. त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अंगावर चाकुचेही वार करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी धाव घेताच हल्लेखोर पळून गेले. तोपर्यंत यश मित्तल गंभीर जखमी झाले होते. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी नरेंद्र मित्तल यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, दुचाकीवरुन आलेले १० ते १५ जण नेमके कुठले आहेत, त्यांनी यश मित्तल यांच्या गाडीचा पाठलाग का केला, संभाजीनगर येथील त्यांच्या घरासमोर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला का केला, हे पोलिस तपासात समोर येणार आहे.