परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत आलमगीर खान यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास माजीमंत्री आमदार अमित देशमुख, परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, रविराज देशमुख आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून दुर्राणी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरु होती. दरम्यान दुर्राणी यांचे परभणी महापालिकेतील माजी सदस्य तसेच पाथरी नगरपालिकेतील माजी पदाधिकारी व सदस्य, पाथरी बाजार समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत माजी पदाधिकारी व समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना दुर्राणी यांनी म्हणाले की, आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला कारण काँग्रेसची विचारधारा मिळती जुळती आहे. विशेषतः काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सर्वदूर परिचित आहे. भारतीय जनता पार्टी सारख्या सत्तारुढ पक्षाच्या विरोधात दिल्ली ते गल्ली काँग्रेसनेच लढा सुरु ठेवला आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला परभणी जिल्ह्यात उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.