सादिक शेख / आन्वा : भोकरदन तालुक्यात ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे सध्या सर्वत्र चित्र आहे. पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

सादिक शेख / आन्वा : भोकरदन तालुक्यात ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे सध्या सर्वत्र चित्र आहे. पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.
तालुक्यातील दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व दुय्यम व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो.
या व्यवसायावर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. पशुगणनेनंतर हा आकडा नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात म्हैस वर्ग आणि जर्सी गाईंचे प्रमाण अधिक आहे. देशी गाईंची संख्या त्या तुलनेत फारच कमी आहे. देशी गाईंच्या संगोपनावर अधिक भर दिल्यास, दुधाचे उत्पादन व त्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. दूध उत्पादक शेतकरी सध्या वाढत्या पशुखाद्याच्या किमतींमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा दर अत्यंत कमी आहे.
सध्या म्हशीच्या दुधाचा दर फॅटनुसार किमान ६० (प्रति लिटर) तर गाईच्या दुधाचा दर किमान ५० (प्रति लिटर) आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत हे दर अगदी अपुरे असून दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे दूध दरवाढ करण्याची आणि अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळण्याची मागणी केली जात आहे. जर दूध दरात सुधारणा झाली नाही, तर अनेक पशुपालक शेतकऱ्यांचा हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील दुग्ध व्यवसायावर मोठे संकट ओढवू शकते.
पशुखाद्याचे असे आहेत दर
कडबा सिंगल कट्टी २५००ते २८००, दोन कट्टी ३५०० ते ३८००
मुरघास – ८००० -१०००० प्रति टन
सरकी पेंड – १२०० ते १४०० ( प्रति ४० कीलो )
शेंग पेंड – १३००ते १७०० ( प्रति ४० किलो )
मका काटा – ११५० ( प्रति ४५ किलो )
गोळी पेंड – १३०० ते १६०० ( प्रति ५० किलो )
हरभरा कळना – १३०० ( प्रति ५०किलो)
तूर कळना – १०५० ( प्रति ५० किलो )
गहू आटा – १४०० ( प्रति ४५ )
दुग्धव्यवसाय परवडेना
वाढत्या पशुखाद्याच्या दराने व उलट दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने खर्चाचा ताळमेळ घालणे चांगलेच जिकिरीचे झाले आहे. त्यातच सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांच्या देखभालीनेही मेटाकुटीला आलो आहे. पर्यायी व्यवसायाचा शोधा घ्यावा का या विचारात आहे.
– अशोक सोनूने, दुध व्यवसाय उत्पादक