बुलढाणा : पंजाबमधील अमृतसर, पठाणकोठ मध्ये दिसून आलेला पाकिस्तानचा ड्रोन हल्ला पुन्हा भारताने हाणून पाडला. शुक्रवारच्या उत्तररात्री झालेल्या घटनेचा थरार अनेकांनी अनुभवला.

अभिषेक वरपे/ बुलढाणा : पंजाबमधील अमृतसर, पठाणकोठ मध्ये दिसून आलेला पाकिस्तानचा ड्रोन हल्ला पुन्हा भारताने हाणून पाडला. शुक्रवारच्या उत्तररात्री झालेल्या घटनेचा थरार अनेकांनी अनुभवला. जालंधरच्या लवली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी अथर्व भास्कर मापारी (19 वर्ष) हा देखील या घटनेचा साक्षीदार बनला आहे. दरम्यान, ना. जाधव यांच्या प्रयत्नाने तणावपूर्ण स्थितीत अडकेल्या जिल्ह्याच्या भूमिपुत्राला ना. जाधव यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सुखरूप आणण्यात आले असून त्याची लोणार येथे पोहोचण्याची व्यवस्था ना. जाधव यांची टीम करित आहे.
अर्थवचे वडील डॉ. भास्कर मापारी(रा. लोणार) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या उत्तररात्री झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नानंतर जालंधर येथील लवली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा परिसर खाली करण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार, कॅप्समधील सर्व विद्यार्थ्यांना घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, मित्राची काही महत्वाची कागदपत्रे घेण्यासाठी अथर्व त्याच्यासोबत काही काळ थांबला होता. चिंतेत असल्याने डॉ. मापारी यांनी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या व्हॉटसअप वर मेसेज टाकून माहिती दिली. थोड्यावेळानंतर स्वतः ना. जाधव यांनी फोन करुन विचारपुस केली. त्यानंतर, ना. जाधव यांच्या टीमने सर्वप्रथम अथर्व व त्याच्या मित्राला घरी पोहोचवण्यासाठी जालंधर – वाशिम अश्या मार्गाने जाणाऱ्या रेल्वेची व्यवस्था केली होती. मात्र, पंजाबमध्ये तणावपूर्ण स्थिती असल्याने रेल्वे व विमानसेवेत अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर, एका खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अथर्व दिल्ली येथील ना. जाधव यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाला. शनिवारी सकाळी साडेसहा दरम्यान, दोघे मित्र तिथे दाखल झाले होते.
तत्परतेसह ना. जाधवांच्या आपुलकीचा प्रत्यय
अथर्व मापारी याला जालंधर येथून दिल्ली आणण्यासाठी ना. जाधव यांची टीमने अतिशय महत्वाची भूमिका निभावली. लोणार येथील बळीराम मापारी, ना. जाधव यांचे स्वीय सहाय्यक राहुल सोलंके यासह अन्य स्थानिक नेते अथर्वच्या वडिलांच्या सोबत होते. एव्हढेच नाही तर, स्वतः प्रतापराव जाधव यांनी अनेकदा त्यांच्याशी बातचीत करुन अथर्व सुखरूप असल्याची माहिती दिली. यामुळे, पुन्हा एकदा ना. जाधव यांची तत्परता आणि आपुलकी दिसून आली.