मानोरा : तालुक्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी शेतकरी मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या सर्वपक्षीय मोर्चात हजारो शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते.

मानोरा : तालुक्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी शेतकरी मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या सर्वपक्षीय मोर्चात हजारो शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयापासून झाली. दिग्रस चौक, झेंडा चौक मार्गे तहसील कचेरीवर पोहोचून घेण्यात आली. यावेळी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत दिवाळीपूर्वी देण्याची, तात्काळ कर्जमाफी करण्याची, तसेच अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, नदी-नाल्यालगतच्या खरडून गेलेल्या जमिनींसाठी मोबदला मिळावा, वन्यप्राण्यांच्या त्रासापासून बचावासाठी ९० टक्के अनुदानावर तारकुंपण द्यावे, शेतमजुरांसाठी ‘खावटी योजना’ तातडीने सुरू करावी, आणि पंजाबप्रमाणे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. सभेत डॉ. विठ्ठलराव घाडगे, माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश संघटक अरविंद पाटील इंगोले, युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी, माजी जि.प. अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे, डॉ. शाम जाधव, महंत रमेश महाराज यांनी भाषण केले. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष बाबुसिंग नाईक, सभापती डॉ संजय रोठे, ठाकुरसिंग चव्हाण, प्रकाश राठोड, विजय पाटील, निळकंठ पाटील, अशोक चव्हाण, काशीराम राठोड, रविंद्र पवार, अमोल तरोडकर, अ. बशीर अ. रहीम, प्रकाश जाधव, शाम राठोड, मधुसूदन राठोड, बंडू राऊत, उमेश महाराज ( राठोड ), सुधाकर चौधरी, मनोहर राठोड, इफ्तेखार पटेल, नरेंद्र राऊत, सुनील देशमुख, प्रवीण राऊत व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन : माजी आ. अनंतकुमार पाटील
माजी आमदार अनंतकुमार पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते, परंतु ते हवेत विरले आहे. अतिवृष्टीसाठी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी सरसकट ५० हजार रुपयांची मदत, कर्जमाफी व पिक विमा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला
