वाशिम: पोलिसांनी शुक्रवारी राबविलेल्या नाकाबंदीत नागपूरहून हैदराबादला गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडून आरोपीस अटक केली.

वाशिम: पोलिसांनी शुक्रवारी राबविलेल्या नाकाबंदीत नागपूरहून हैदराबादला गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडून आरोपीस अटक केली.
पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास, वाशिम ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर तोडगाव फाटा भागात पोलीस स्टॉपसह नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान वाशिमकडून हिंगोलीकडे जात असलेल्या संशयित वाहन क्रमांक (एम एच ४० बी.जी. ४०७६) ला थांबवण्याचा इशारा दिला असता, वाहन चालकाने अधिक वेगाने पळ काढला. सुमारे १० किमीचा पाठलाग करून पोलीस पथकाने वाहन थांबविण्यात यश मिळवले. झडतीत वाहनातून २२ गोवंश जातीचे जनावरे सापडली. वाहन चालकाने आपले नाव रमीस रजा खान (वय २५, कामगारनगर, नागपूर) असे सांगितले. चौकशीत त्याने सांगितले की हे जनावरे नागपूरहून भरून हैदराबाद येथे कत्लीसाठी नेले जात आहेत. सदर वाहनाची किंमत १४,००,००० रुपये, तर २२ गोवंश जनावरांची किंमत ४,२५,००० रुपये असून एकूण १८,२५,००० रुपये मूल्याची मालमत्ता पोलीसांनी ताब्यात घेतली. हे जनावरे शिरपूर येथील गौशाला येथे सुरक्षित ठेवण्यात आले. या कारवाईअंतर्गत आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गोवंश संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, दीपक घुगे, अमोल ईरतकर, संतोष वाघ, संदीप दूतोंडे, सुनील तायडे यांच्या पथकाने केली. वाशिम ग्रामीण स्टेशनच्या सपोनि श्रीदेवी पाटील, जगनाथ घाटे, प्रशांत अंभोरे, प्रवीण राऊत, संदीप गायकवाड, बन्सी चव्हाण यांनी देखील मोलाची कामगिरी बजावली आहे.
