छत्रपती संभाजीनगर : शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करून भाजपा उमेदवार अतुल सावे यांच्या काळजात धडकी भरविलेले काँग्रेसचे एम. के. देशमुख यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. आगामी मराठवाडा पदवीधर मतदार संघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करून भाजपा उमेदवार अतुल सावे यांच्या काळजात धडकी भरविलेले काँग्रेसचे एम. के. देशमुख यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. आगामी मराठवाडा पदवीधर मतदार संघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा परिषदेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले एम.के.देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र ही लढत भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांच्याशी होणार असल्याने आणि देशमुख यांचा जवळपास विजय निश्चित मानला जात असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी काँग्रेसने उमेदवार बदलून सावे यांच्या तुलनेत कमकुवत असलेल्या लहू शेवाळे यांना उमेदवारी दिली. या अदलाबदलीमुळे भाजपा उमेदवार अतुल सावे यांच्या काळातील धडकी कमी होऊन ते काठावर निवडून आले. त्यामुळे थोडक्यात आमदारकीचे स्वप्न भंगल्याने आणि पदवीधरांसाठी जोरदार तयारी सुरू केलेले एम.के.देशमुख यांच्यासह शिक्षक संघटनेचे नेते मनोज पाटील यांनी बुधवारी, 29 ऑक्टोबर रोजी
सकाळी ११ वाजता भाजपा प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय काणेकर, अनिल मकरीये आदींची उपस्थिती होती.
उमेदवारीसाठी प्रवेश नाही
भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय काणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार निवडून आणणार असल्याचा शब्द दिला आहे. नक्कीच मी या कार्यात संपूर्ण सहकार्य करणार आहे. लोकांमध्ये जरी चर्चा असली की मी आगामी निवडणुकीतील उमेदवारीसाठी भाजपात प्रवेश करीत आहे. तरी यात तथ्य नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याचे काम मी करणार आहे. काम करत असताना काही संधी मिळत असेल तर आनंद आहे. अशा भावना भाजपा प्रवेशावेळी एम. के. देशमुख यांनी व्यक्त केल्या.
